हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वात बाप्पा जोशी म्हणजेच अभिनेता विद्याधर जोशी हे अत्यंत नावाजलेले नाव आहे. मराठी नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या ढंगाच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक स्वरूपाच्या त्यांनी साकारलेल्या भूमिका कायम चर्चेत राहिल्या आहेत. मात्र मध्यंतरी ते गंभीर आजाराने त्रस्त असल्याचे नुकतेच समोर आले आहे. तब्बल दहा महिने त्यांनी श्वसन विकाराशी झुंज दिली आणि आता अखेर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा आहे. याविषयी त्यांनी एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
एका नामवंत वाहिनीशी संवाद साधताना बाप्पा जोशींनी आपल्या आजारपणाबद्दल माहिती दिली आहे. बाप्पा म्हणाले, ‘कोविडच्या पहिल्या लाटेत मला कोरोना झाला. त्यानंतर औषधोपचारांना झाले आणि काही दिवसांनी मला दुसऱ्यांदा कोरोना झाला. पण त्यावेळी हा साधा ताप नसून यामागील कारण वेगळे असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. सिटी स्कॅन केल्यावर माझ्या फुफ्फुसांवर जखमा आढळल्या आणि ‘इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस’ या आजाराचे निदान झाले’. मुख्य म्हणजे अशा परिस्थितीतही बाप्पा जोशी चालू प्रोजेक्ट्सचे काम न थांबवता शूटिंग पूर्ण केले.
पुढे ते म्हणाले, ‘हा आजार वाढत गेला आणि २ महिन्यांत ८० ते ८५ टक्के फुफ्फुसं निकामी झाली. फुफ्फस प्रत्यारोपण (lungs transplant) हा एकमेव पर्याय राहिला. प्रत्यारोपण प्रक्रिया प्रचंड खर्चिक होती. परंतु, तरीही कुटुंबीय आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला. पायाच्या एका बोटाची हालचाल करायला किती ताकद लागते याची जाणीव शस्त्रक्रियेनंतर झाली. मी जवळपास पांगळा झालो होतो. व्यायाम हवा, विश्रांती हवी अशा सगळ्या गोष्टी आठवून आपल्या शरीराची किंमत मला कळली. या वेळी अजित भुरे, वंदना गुप्ते, महेश मांजरेकर, धनंजय गोरे, लीना गोरे, वैशाली यांनी सतत चौकशी करुन पाठिंबा देत होते. दरम्यान, जानेवारीमध्ये सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात शस्त्रक्रिया झाल्यावर १० दिवसांच्या उपचारानंतर मला घरी सोडण्यात आले. आता मी नैसर्गिक श्वास घेऊ शकतो’. यानुसार बाप्पा यांच्या तब्येतीत आता बरीच सुधारणा असल्याचे सांगण्यात आले आहे.