प्रसिद्ध मॅगझीनने छापला केदार शिंदेंवर लेख; पत्नी बेला भावुक होत म्हणाल्या, ’27 वर्षे त्याची धडपड..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे हे मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीचे आघाडीचे दिग्दर्शक आहेत. आजपर्यंत त्याने मराठी कलाविश्वाला एकापेक्षा एक सरस कलाकृती दिल्या आहेत. ‘अग्गंबाई अरेच्छा’, ‘जत्रा’, ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटांनी तर इतिहास घडवला. केवळ चित्रपट नव्हे तर नाटक, मालिका आणि लोककलेच्या माध्यमातून त्यांनी मनोरंजन सृष्टीत पाय रोवले. यशासोबत अनेकदा अपयश देखील त्यांच्या वाटेला आले. एका चित्रपटाच्या अपयशानंतर ७ वर्षांच्या ब्रेकनंतर २०२३ मध्ये केदार शिंदे यांनी मनोरंजन सृष्टीत असं काही पुनरागमन केलं की त्यांच्या प्रवासाची दखल राष्ट्रीय पातळीने सुद्धा घेतली.

गतवर्षी २०२३ मध्ये केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ आणि ‘महाराष्ट्र शाहीर’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाल केली. केदार शिंदेंच्या या कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आणि यंदाच्या ‘फोर्ब्स इंडिया मॅगझिन’मध्ये त्यांच्याविषयी लिहिण्यात आलं आहे. मुख्य म्हणजे साऊथचा अ‍ॅटली, बॉलिवूडचे करण जोहर, सिद्धार्थ आनंद आणि विधू विनोद चोप्रासह मराठमोळे दिग्दर्शक केदार शिंदे त्याच पेजवर झळकले. याचा आनंद केदार शिंदेंच्या पत्नी बेला शिंदे यांनी शेअर केला आहे.

बेला शिंदे यांनी अधिकृत सोशल मीडिया हँडलवर फोर्ब्स इंडिया मॅगझिनचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये केदार यांच्यावर लिहिलेला लेख दिसतोय. सोबत कॅप्शनमध्ये बेला यांनी लिहिलं, ‘काल काही ठाऊक नसताना ही माझ्या आयुष्यात घटना घडली… Forbes India magazine (फोर्ब्स इंडिया मॅगझीन)मध्ये केदार विषयी लिहून आलं. हा माझ्यासाठी सुखद धक्का होता. कुठल्यातरी अनोळखी व्यक्तींनी ही घेतलेली दखल. थोरामोठ्यांच्या मांदियाळीत त्याला पाहिलं. डोळे पाणावले. २७ वर्षे त्याची धडपड पाहत आहे. हे सगळं घडलं ते तुम्हा रसिकांच्या प्रेमाने. स्वामी कृपेने त्याची घोडदौड अशीच सुरू राहो. त्यावर तुम्हा सगळ्यांचं प्रेम कायम राहो… अजून बराच पल्ला गाठायचा आहे. श्री स्वामी समर्थ’. या पोस्टवर अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.