भरत जाधव घेऊन येतायत नवं नाटक; अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं.. ‘अस्तित्व’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नवनवीन कथा, आशय असणारी वेगवेगळ्या जॉनरची नाटके रंगभूमीवर येत असतानाच आता अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं अस्तित्व शोधणारे एक कौटुंबिक नाटक नाट्यरसिकांच्या भेटीला येत आहे. भरत जाधव एण्टरटेनमेंट निर्मित ‘अस्तित्व’ हे नाटक लवकरच नाट्यप्रेमींच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहे. स्वप्नील जाधव लिखित, दिग्दर्शित ‘अस्तित्व’ या नाटकाचा येत्या ३ नोव्हेंबर रोजी शुभारंभाचा प्रयोग असून यात चिन्मयी सुमित, सलोनी सुर्वे, हार्दिक जाधव, श्याम घोरपडे, जयराज नायर आणि भरत जाधव प्रमुख भूमिकेत आहेत.

भरत जाधव हे एक हरहुन्नरी अभिनेते आहेत. आजवर त्यांनी विविध भूमिका साकारून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. बऱ्याच विनोदी भूमिका साकारल्या. नकारात्मक भूमिकाही त्यांनी केल्या. मात्र आता बऱ्याच काळानंतर भरत जाधव या नाटकाच्या माध्यमातून एका वेगळ्याच रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या नाटकाच्या निमित्ताने सलोनी सुर्वे, हार्दिक जाधव हे नवोदित कलाकार व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करत आहेत. साई पियुष यांचे या नाटकाला संगीत लाभले असून सरीता भरत जाधव या नाटकाच्या निर्माती आहेत.

नाटकाची कथा एका अशा कुटुंबाची कहाणी आहे, जे आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत आहे. कुटुंबातील एकमेव कमावणाऱ्या आणि नोकरीतून लवकरच निवृत्त होणाऱ्या संतोष हसोळकरची ही गोष्ट आहे. ज्याने निवृत्तीनंतर मुंबई सोडण्याचा निर्णय घेतलाय मात्र त्याच्या या निर्णयाला घरच्यांचा विरोध असून प्रत्येक जण आपल्या अस्तित्वाच्या शोधात आहेत. त्यामुळे आता त्यांची ही धडपड यशस्वी होणार का..? याचे उत्तर आपल्याला येत्या काळात मिळणार आहे.