भारी वाटलं! चाहत्यामुळे प्राजु पोहोचली थेट ‘केबीसी’च्या मंचावर; स्वतः ‘बिग बीं’नी लावला व्हिडीओ कॉल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वात आपल्या कलेच्या जोरावर घट्ट पाय रोवून उभी राहिलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी कायम चर्चेत असते. या ना त्या कारणामुळे प्राजक्ताच्या नावाची कायम चर्चा होत असते. अलीकडेच तिचा ‘तीन अडकून सीताराम’ हा चित्रपट आला. तर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात ती सूत्रसंचालन करताना दिसते. मालिका, चित्रपट, सिरीजमधून प्राजक्ताने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यामुळे तिचा चाहता वर्ग फार मोठा आहे. अशातच प्राजक्ताला एका चाहत्यामुळे थेट बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमोर झळकण्याची संधी मिळाली.

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचे गेली अनेक वर्ष होस्टिंग करत आहेत. या शोमध्ये हॉट सीटवर बसून प्रश्न उत्तरांचा खेळ खेळला जातो. यामध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकाच्या इच्छा बिग बी कायम पूर्ण करण्याचा प्रयत्न करताना दिसतात आणि याहीवेळी असंच झालं. अजय नावाचा एक स्पर्धक केबीसीत सहभागी झाला होता. जो प्राजक्ता माळीचा मोठा चाहता आहे, असं त्याने सांगितलं. मग काय बिग बींनी मेकर्सला थेट प्राजक्ताशी कनेक्ट करून द्यायला सांगितलं. मग प्राजक्ताला अभिवादन करून त्यांनी अजयची ओळख करून दिली. यानंतर प्राजक्ताने अजयला शुभेच्छा दिल्या आणि ‘तू जिंकलास, तर आपण नक्की भेटू’, असे सांगितले.

प्राजक्ताने अमिताभ बच्चन यांचे आभार मानले आणि तुम्ही असंच आमच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमावर प्रेम करत रहा, असे सांगितलं. हा व्हिडीओ प्राजक्ताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हॅण्डलवर शेअर करत लिहिलं, ‘काय सांगू किती भारी वाटलं! अशा पद्धतीनं ”कौन बनेगा करोडपती” कार्यक्रमात सहभागी होईन असं कधीच वाटलं नव्हतं. म्हणूनच मी नेहमी म्हणते…तुमचे चाहते तुमचा सर्वात मोठा आधार असतात. फक्त अजय मुळे ते शक्य झालं… केवळ प्रेम! सोनी मराठीची टीम सुद्धा यामुळे आनंदी झाली होती. त्यांनीही फार आनंदानं खूप सहकार्य केलं. त्यांचेही मनापासून आभार..आणि सरते शेवटी आमचे लाडके महाराष्ट्राची हास्यजत्रेचे अमित फाळके…अशा पद्धतीच्या कार्यक्रमात नेमकं काय-किती-कसं बोलावं याविषयी मनात अनेक प्रश्न होते, ज्यात त्यांनी मला मोलाचं मार्गदर्शन केलं. मला लाभलेल्या या संधीसाठी त्यांना माझ्यापेक्षाही जास्त आनंद झाला. त्यांनाही मनापासून धन्यवाद’. प्राजक्ता माळीच्या या पोस्टवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.