‘सिंधुताई.. माझी माई’; कलर्स मराठीच्या नव्या मालिकेतून उलघडणार ‘गोष्ट चिंधीची’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका विश्वात अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या जीवनगाथा, यशोगाथा आपल्याला पहायला मिळतात. यांमध्ये आता दिवंगत ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्याही चिंधीची गोष्ट छोट्या पडद्यावर उलगडणार आहे. येत्या १५ ऑगस्ट २०२३ पासून कलर्स मराठी या लोकप्रिय वाहिनीवर माईंची चरित्रकथा आपल्याला पाहता येणार आहे. यामुळे माईंना अतिशय जवळून जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची एक संधी प्रत्येकाला मिळणार आहे. या नव्या मालिकेचे शीर्षक ‘सिंधुताई…माझी माई’ असे आहे.

मुख्य म्हणजे या मालिकेत मराठी अभिनेते किरण मानेदेखील एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. याबाबत त्यांनी स्वतःच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली होती. ज्यामध्ये त्यांनी लिहिलंय, ‘…लवकरच मला बघा एका जबरदस्त भूमिकेत! तुम्हाला भारून टाकेल, हळवं करेल आणि प्रेरणाही देईल अशा अफलातून कलाकृतीत.. शाळा सुटल्यावर लेकरं घराकडं ज्या ओढीनं धावत येतात… सासुरवाशीण ज्या आतुरतेनं माहेराकडं धाव घेते… ‘पंढरी’ हाकेच्या अंतरावर आल्यावर वारीतला वारकरी ज्या बेभानपणे धावा करतो… अगदी तसंच, तुम्ही दुसर्‍या कुठल्याबी चॅनलवर काहीही बघत असाल, तर ते चॅनल बदलून ‘कलर्स मराठी’ कडे धाव घेऊन ‘सिंधुताई…माझी माई !’ बघण्यासाठी आतूर व्हाल… एवढी अफाट ताकद असलेलं मनोवेधक कथानक घेऊन येतोय… १५ ऑगस्टपासून !’

‘सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधीची’ असे या मालिकेचे शीर्षक असून ही मालिका अनेकांसाठी आयुष्यातील हळवं पान ठरणार आहे. आतापर्यंत केवळ प्रोमो व्हिडीओ शेअर करत हि चरित्र गाथा असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, अजूनही या मालिकेत कोणते कलाकार दिसणार आहेत..? सिंधुताईंच्या भूमिकेत कोणती अभिनेत्री पहायला मिळणार आहे..? याबाबतची माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. हा व्हिडीओ जेव्हापासून रिलीज झालाय तेव्हापासून प्रेक्षकांमध्ये मात्र या मालिकेबाबत विशेष उत्सुकता पहायला मिळत आहे.