बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं ‘बाईपण भारी देवा’चं कौतुक; म्हणाली, ‘खूप खूप खूप..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट ३० जून २०२३ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आता चार आठवडे पूर्ण झाले आहेत. आतापर्यंत या चित्रपटाने ६५ कोटींचा गल्ला पूर्ण केला आहे. तसेच या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड ब्रेक केले असून प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप पाडली आहे. हि छाप केवळ प्रेक्षकांच्या नव्हे तर समीक्षकांच्या आणि अगदी बॉलिवूडकरांच्याही मनावर पडली आहे. नुकतीच बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर हिने ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट पाहिला आणि न राहवून तिने भरभरून कौतुक केले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर हिने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. यामध्ये तिने ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. सोबतच तिने लिहिले आहे कि, ‘बाईपण भारी देवा, कसला कमाल चित्रपट आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. अनेकजण म्हणतात, की हल्ली चांगले चित्रपट कुठे बनतात…? त्यांना सांगावेसे वाटते बनतात बॉस!! गेल्या ५ आठवड्यांपासून हा चित्रपट चित्रपटगृहात हाऊसफुल सुरु आहे’.

‘नुकतंच हैदराबादमध्ये हा चित्रपट पाहिला, तो देखील हाऊसफुल शो होता. खरंच खूप खूप खूप अभिमान वाटतो. नक्की बघा’. यासोबत आणखी एक स्टोरी शेअर करत तिने लिहिलं, ‘बाईपण भारी देवा चित्रपटाने हैदराबादमधील प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. क्या बात है।’ मृणालची ही पोस्ट चित्पातांचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी शेअर करत तिचे आभार मानले आहेत. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात ६ बहिणींची त्यांची त्यांची एक गोष्ट एकत्र बांधून एक भावस्पर्शी कथानक तयार करण्यात आले आहे. रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा परब चौधरी या अभिनेत्रींनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे.