हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। श्रीराम नेने व माधुरी दीक्षित नेने निर्मित ‘पंचक’ चित्रपटातील जगण्याचे सार उमगवणारे एक सुरेख गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ‘ज्याला त्याला उमगते, ज्याची त्याची भाषा, बाकी इथे जगण्याचा रोजचा तमाशा…’ असे बोल असलेले हे गाणे आयुष्याचा भावार्थ सांगत आहे. गुरु ठाकूर यांचे हृदयस्पर्शी शब्द लाभलेल्या या भावनिक गाण्याला मंगेश धाकडे यांनी संगीत दिले आहेत तर अभिजीत कोसंबी याचा जादुई आवाज या गाण्याला लाभला आहे. या गाण्याच्या शब्दांमध्ये अनेक भावना आहेत.
गीतकार गुरु ठाकूर म्हणतात, ‘अनेक घडामोडी घरात घडत आहेत आणि त्या सगळ्यांना अनुसरून या गाण्याचे बोल रचायचे होते. प्रत्येक व्यक्तिरेखेच्या आयुष्यात वेगवेगळ्या पातळीवर द्वंद्व सुरु आहेत. त्यामुळे या शब्दांमध्ये आर्तता खूप महत्वाची होती. अभिजीत कोसंबीने आपल्या आवाजाने हे गाणे एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे. संगीतही त्याचा दर्जाचे आहे. गाण्याबद्दल दिग्दर्शक राहुल आवटे म्हणतात, ‘गुरु ठाकूर यांनी अत्यंत सुंदर शब्दात जीवनातील सफर मांडली आहे. ज्याला मंगेश धाकडे यांनी उत्तम संगीताची साथ लाभली आहे. खूप भावनिक आणि मनाला भिडणारे हे गाणे आहे. प्रत्येकाच्या आयुष्याशी साधर्म्य साधणारे हे गाणे आहे’.
जयंत जठार आणि राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते आहेत. आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दिप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या नव्या वर्षात ५ जानेवारी २०२४ रोजी सर्वत्र महाराष्ट्रातील थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.