पूजा सावंतसाठी मराठी दिग्दर्शकाची पोस्ट; म्हणाले, ‘आज स्वातंत्र्यातला तुझा शेवटचा दिवस..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंतचा आज वाढदिवस. यानिमित्त सोशल मीडियावर अनेक चाहते तिच्यासाठी खास पोस्ट शेअर करत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. मात्र यामध्ये पूजाच्या मित्र मंडळींपैकी एका व्यक्तीची पोस्ट फारच व्हायरल होते आहे. हि व्यक्ती म्हणजे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कणसे. मैत्रीण पूजाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे आणि यात तिच्या स्वातंत्र्याचा शेवटचा दिवस असा उल्लेख करण्यात आला आहे. चला तर पाहुयात या पोस्टमध्ये त्यांनी नेमकं काय लिहिलंय…

चंद्रकांत कणसे यांनी पूजा सावंत आणि त्यांच्या पत्नीचा फोटो शेअर करत म्हटले आहे कि, ‘वरील फोटोमध्ये दिसणाऱ्या दोन बायका, माफ करा एक बाई आणि दुसरी पुढच्या महिन्यात होऊ घातलेली बाई… बाईचं नाव रेणुका आणि होऊ घातलेलीच नाव पूजा… नीट बघाल तर दोन्ही नावं देविंशी संबंधित, देवीच म्हणाना… तर, या दोन देव्या माझ्या आयुष्यात आल्या, एक जिवाभावाची प्राणप्रिय बायको म्हणून तर दुसरी जिवाभावाची प्राणप्रिय मैत्रीण म्हणून… एवढं सगळं लिहिण्याच कारण आज माझ्या जिवाभावाच्या प्राणप्रिय मैत्रिणीचा शेवटचा वाढदिवस, माफ करा माफ करा, स्वातंत्र्यातला शेवटचा वाढदिवस… पुढच्या महिन्यात तीच लग्न आहे म्हणून स्वातंत्र्यातला शेवटचा वाढदिवस असं म्हणालो… तर तिला या स्वतंत्र वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा…’

‘पुढच्या वर्षीपासून बंधनातल्या शुभेच्छा देईन… कारण पुढच्या वर्षीपासून नवरा नावाचं बंधन गळ्यात असेल तुझ्या म्हणून आज स्वातंत्र्यातला शेवटचा वाढदिवस मनाप्रमाणे जगून घे, खूप मज्जा कर, धुडगूस घाल… तशी तू बंधन मानणारी आणि कोणाला घाबरणारी (मलासोडून) मुलगी नाहीस तरीही नवरा नामक धाक हा थोडासा का असेना असतोच… आता म्हणाल लिहायचं तर मैत्रिणीबद्दल होतं तर बायकोचा दिखावा कशाला तर आपल्यापेक्षा अवाजवी महत्त्व दुसऱ्या मुलीला दिले तर बायको नामक प्राणी कुठल्याही थराला जाऊ शकतो.. (माझी बायको तशी नाही ती माझ्या धाकात आहे असे फक्तं आणि फक्तं मीच मानतो) वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय पूजा!!’