दमदार ‘सुभेदार’.. चंद्रकांत पाटलांनी थिएटरमध्ये अनुभवला कोंढाण्यावरील थरार; दिग्दर्शकाचे केले कौतूक


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘श्री शिवराज अष्टक’ हि प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांची संकल्पना आहे. याच्या माध्यमातून आजच्या पिढीला श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे दिग्पाल लांजेकर तरुणाचा आदर्श होऊ लागले आहेत. या अष्टकातील पाचवे पुष्प ‘सुभेदार’ हा चित्रपट गेले तीन आठवडे बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करतोय. या चित्रपटाचे अनेक प्रेक्षक, कलाकार आणि नेते मंडळींनी कौतुक केले. आता भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रकांत पाटील यांनीदेखील ‘सुभेदार’ पहिला असून अष्टकास आपला पाठिंबा दर्शवला आहे.

दिग्पाल लांजेकर यांचा ‘सुभेदार’ हा चित्रपट अजुनही थिएटरमध्ये हाऊसफुल्ल सुरु आहे. या चित्रपटातून सुभेदार तानाजी मालुसरे यांची वीरगाथा मोठ्या पडद्यावर पाहायची संधी प्रत्येकाला मिळाली आहे. अशातच भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात त्यांच्या सहकाऱ्यां समवेत ‘सुभेदार’ हा ऐतिहासिक चित्रपट पाहिला. सुभेदार हा चित्रपट पाहिल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचे भरभरून कौतुक केले आहे. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी शिवप्रतिमा भेट देऊन चंद्रकांत पाटील यांचे आभारदेखील मानले.

दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’मधील एकुण ५ चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. यापैकी पहिला सिनेमा ‘फर्जंद’पासूनच चंद्रकांत पाटील यांचे बहुमोल सहकार्य ‘श्री शिवराज अष्टक’ या चित्रपट मालिकेला लाभल्याचे लांजेकर म्हणाले. इतकेच नव्हे तर ‘श्री शिवराज अष्टक’ला आपला पाठिंबा असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी कृतीतून दर्शवले आहे. शिवराज अष्टकातल्या ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ यानंतर ‘सुभेदार’ हा अशा पाचही चित्रपटांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. आता आगामी चित्रपटाची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत.