हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बुधवारी ६ डिसेंबर २०२३ रोजी मराठी अभिनेत्री सुरुची अडारकर आणि अभिनेता पियुष रानडे एकमेकांसोबत विवाह बंधनात अडकले. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो समोर येताच चाहत्यांना सुखद धक्का लागला.
सुरुचीने स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर पती पियुष रानडेसोबतचे फोटो शेअर केले आहेत. लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता त्यांच्या वेडिंग रिसेप्शनचे फोटो समोर आले आहेत. जे व्हायरल होताना दिसत आहेत.
अभिनेत्री सुरुची अडारकरने तिच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलवर हे फोटो शेअर केले आहेत. लग्नाचे फोटो शेअर करताना तिने ‘आनंदाचा दिवस’ असे कॅप्शन दिले होते. या फोटोत पियुष सुरुचीच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना दिसत आहे. लग्न लागतेवेळी सुरुचीने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली होती. तर पियुषने तिला मॅचिंग कुर्ता लेहंगा परिधान केला होता. यानंतर तिने आणखी एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने गुलाबी रंगाची साडी आणि पियुषने बेबी पिंक रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. दोघांच्या गळ्यात हार दिसत आहेत. या फोटोसोबत तिने ‘आणि आम्ही सारे प्रेमात गुलाबी झालो..’ असे कॅप्शन दिले आहे.
यानंतर सुरुचीने वेडिंग रिसेप्शनचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने गुलाबी रंगाचा लॉन्ग पार्टी गाऊन परिधान केला आहे. तर पियुषने काळ्या रंगाचा ब्लेझर कोट परिधान केला आहे. या फोटोंमध्ये दोघेही एकत्र आनंदी दिसत आहेत. त्यांच्या या फोटोंवर नेटकरी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. शिवाय सुरुचीने इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत सर्वांचे आभार मानताना लिहिलं, ‘माझे कुटुंब, मित्र परिवार यांनी भरभरुन दिलेल्या प्रेमासाठी आणि आशीर्वादासाठी त्यांचे खूप खूप आभार. आम्ही तुमच्यावर प्रेम करतो. त्याबरोबर प्रसारमाध्यमांनी आमच्यावर केलेल्या शुभेच्छांच्या वर्षावासाठी त्यांचेही धन्यवाद. आम्ही सदैव कृतज्ञ राहू’.