अरे हे तर ‘सुभेदार’…; चिन्मय मांडलेकरने परिधान केलेल्या ‘त्या’ टी- शर्टने वेधलं तरुणाईचं लक्ष


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या दिग्पाल लांजेकर यांचा बोलबाला आहे. त्यांचे ‘श्री शिवराज अष्टक’ प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरले आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशीकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ यानंतर आता श्री शिवराज अष्टकातील पाचवे चित्रपुष्प ‘सुभेदार’ येत्या २५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा पाचवा चित्रपट सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित आहे. यामध्ये अभिनेता अजय पुरकर सुभेदार मालुसरेंच्या भूमिकेत तर अभिनेता चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान चिन्मयने तानाजी मालुसरेंच्या प्रतिमेचे टीशर्ट परिधान केले होते. जे आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे.

सुभेदारांची प्रशासकीय रणनिती, कोंढाण्याची लढाई या ऐतिहासिक गोष्टीची भव्यता ‘सुभेदार’ या चित्रपटातून पाहता येणार आहे. सध्या या चित्रपटाची संपूर्ण टीम ठिकठिकाणी प्रमोशनसाठी हजेरी लावताना दिसत आहे. अलीकडेच चित्रपटाच्या संपूर्ण टीमने सिंहगडावर जाऊन नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीचे दर्शन घेतले होते. यावेळी अभिनेता चिन्मय मांडलेकरने सुभेदारांची प्रतिमा असलेला खास टी-शर्ट परिधान केला होता. या टी-शर्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

माहितीनुसार, हा टी- शर्ट सुभेदार चित्रपटातील कलाकारांसाठी सुरज भोई या तरुणाने खास डिझाईन केला आहे. सुरज ‘सुभेदार’च्या टीममधील एक आहे. सिंहगडावर टी- शर्ट परिधान केल्यनंतर चिन्मय मांडलेकरने सुरजसाठी एक पोस्टदेखील शेअर केली होती. ज्यामध्ये त्याने ‘किल्ले सिंहगड हे आपलं तीर्थक्षेत्रच! सुरज भोई या आमच्या मित्राचे खूप आभार. मी परिधान केलेला टी- शर्ट त्यानेच भेट दिला आहे’, असे लिहिले होते. या टीशर्टवर सुभेदार तानाजी मालुसरे यांची प्रतिमा आहे. त्यामुळे टीशर्टचा लुकदेखील अगदी रांगडा आहे. हे टीशर्ट सध्या तरुण वर्गात मोठ्या चर्चेचा विषय ठरले आहे.