हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, राजवारसा प्रॉडक्शन्स आणि मुळाक्षर प्रॉडक्शन्स प्रा. लि. निर्मित ‘सापळा’ या आगामी मराठी चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. येत्या नव्या वर्षात १९ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर गुरुवारी २१ डिसेंबर रोजी एका दिमाखदार सोहळ्यात लॉन्च करण्यात आले. शिवराज अष्टकच्या माध्यमातून दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर या जोडीने अवघा महाराष्ट्र गाजवला आहे. यानंतर आता हि जोडी एका नव्या कथानकासोबत ‘सापळा’ हा चित्रपट घेऊन येत आहे.
माहितीनुसार, या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर, समीर धर्माधिकारी, दीप्ती केतकर, नेहा जोशी या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल लांजेकर यांनी केले आहे. तर श्रीनिवास भणगे यांची कथा आणि पटकथा- संवाद दिग्पाल लांजेकर यांचे आहेत. या चित्रपटाची निर्मिती प्रद्योत प्रशांत पेंढरकर, अनिल नारायणराव वरखडे, दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर यांनी केली आहे. या चित्रपटाबाबत बोलताना दिग्दर्शक निखिल लांजेकर म्हणाले कि, ‘मला गूढकथा नेहमीच आवडत आल्या आहेत. अशाप्रकारच्या कथा या प्रेक्षकांना नेहमीच अत्यंत प्रभावीपणे भुरळ घालतात. एक चित्रपट दिग्दर्शक म्हणून उत्तम कथेच्या शोधात असताना प्रख्यात कथालेखक श्री श्रीनिवास भणगे यांची एक अत्यंत प्रभावी आणि जुनी नाट्यसंहिता वाचनात आली’.
पुढे म्हणाले, ‘आपल्या मराठी साहित्याची भव्य कक्षा ही आश्चर्यचकित करणारी आहे. ही कथा आजच्या तंत्रज्ञानाची जोड देत मोठ्या पडद्यावर आणण्याचा मोह मी आवरू शकलो नाही. श्री दिग्पाल लांजेकर यांच्या समर्थ लेखणीच्या आधारे या कालातीत कलाकृतीची पुनर्निर्मिती आम्ही करत आहोत. याची पटकथा आणि संवाद आजच्या प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून लिहिले गेलेले आहेत. कथेमध्ये अत्यंत बारकाईने सुधारणा करून त्यात आधुनिकता आणली गेली आहे की जेणेकरून ती आजच्या परिस्थितीला साजेशी ठरेल. मला पूर्ण खात्री आहे की, आश्चर्यानी भरलेला हा कथेचा प्रवास प्रेक्षकांना खिळवून तर ठेवेलच पण त्याचबरोबर त्यांना अचंबितसुद्धा करेल. समकालीन आणि कालातीत अशा दोन्हीचा एक आगळा असा मिलाफ यात साधला गेला असून त्यातून एक असा सिनेमॅटिक अनुभव प्रेक्षकांना मिळेल की जो आपल्या समृद्ध अशा कथाकथन परंपरेचा एक नमूना असेल’.