‘नाटक पहा.. मसाला दूध प्या’; ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ची टीम प्रेक्षकांसोबत साजरी करणार कोजागिरी


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बालगंधर्व यांच्या संगीत नाटकाच्या प्रयोगाला येणाऱ्या प्रेक्षकांचं स्वागत त्याकाळी अत्तर लावून केलं जायचं. याच धर्तीवर आता अक्षया नाईक आणि अक्षय मुडावदकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘चुकभूल द्यावी घ्यावी’ या नाटकाच्या प्रयोगावेळी प्रेक्षकांना गोडव्याचा अनुभव मिळणार आहे. कोजागरी पौर्णिमेनिमित्त २८ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री ८:०० वाजता मुंबईतील, दादरमध्ये श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात होणाऱ्या प्रयोगावेळी प्रेक्षकांना नाटकासोबत मस्त मसाला दुधाचा आस्वाद घेता येणार आहे.

वाईड अँगल एंटरटेनमेंट निर्मित (केतकी प्रवीण कमळे) व भूमिका थिएटर प्रकाशित, दिलीप प्रभावळकर लिखित ‘चुकभूल द्यावी घ्यावी’ गोड नात्यांची मिश्किल गोष्ट .ह्या नाटकाचं दिग्दर्शन महेश डोकंफोडे यांनी केलं आहे. संदेश बेंद्रे यांनी नेपथ्य, अशोक पत्की यांनी संगीत, अक्षय मुडावदकर आणि अभिषेक करंगुटकर यांनी गीतलेखन, शीतल तळपदे यांनी प्रकाशयोजना, नेहा मुडावदकर यांनी वेशभूषा, संदीप नगरकर यांनी रंगभूषेची जबाबदारी निभावली आहे. तर अक्षय मुडावदकर, अक्षया नाईक यांच्यासह महेश डोकंफोडे, अमृता तोडरमल यांच्याही नाटकात भूमिका आहेत.

प्रासंगिक आणि अस्सल विनोद असलेले नाटक “चूक भूल द्यावी घ्यावी”प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे.. अभिनय, नाटकाचे नेपथ्य प्रकाशयोजना संगीत तसेच दिग्दर्शन सगळ्यांच बाजूने नाटक सर्वोत्तम झाले असून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद देखील ह्या नाटकाला मिळत आहे.

त्यामुळे “चूक भूल द्यावी घ्यावी” म्हणत यंदाची कोजागीरी प्रेक्षकांच्या साथीने साजरी करण्यात येणार आहे. २८ ऑक्टोबरला रात्र ८:०० वाजता दादरच्या श्री शिवाजी मंदिर येथे प्रेक्षकांना नाटकाचा आनंद आणि दुधाचा आस्वाद घेऊन कोजागरी साजरी करता येणार आहे.