‘दादांची एक्झिट चटका लावणारी..’; नितीन देसाईंच्या आत्महत्येमुळे चित्रपटसृष्टी शोकाकुल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आणि संपूर्ण मनोरंजन विश्व हादरलं. नितीन देसाई यांनी कर्जत येथील त्यांच्या एन. डी. स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी जगाचा अशा पद्धतीने निरोप घेतला की त्यांची एक्झिट प्रत्येकाला चटका लावून गेली. त्यांच्या आत्महत्येचे वृत्त पसरताच मनोरंजन विश्वात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक दिग्गज कलाकारांनी तसेच नेतेमंडळींनी देसाईंच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना महेश कोठारे यांनी दुःख व्यक्त करत म्हटले, ‘माझ्या पायाखालची जमीन सरकली आहे. ‘झपाटलेला २’ हा चित्रपट जो थ्रीडीमध्ये केला होता, त्या चित्रपटाचे पूर्ण प्रोडक्शन नितीन देसाई यांनी डिझाइन केलं होतं. शिवाय तो चित्रपट एन.डी. स्टुडिओमध्ये शूट केला होता. त्यांच्या आत्महत्येबद्दल ऐकून मला फार दुःख झालं आहे. ही आजची मोठी धक्कादायक बातमी आहे आणि त्यात आत्महत्या असल्यामुळे हे खूप आश्चर्यकारक आहे. त्यांनी असं का केलं तेच कळत नाहीये. काहीही असूदे, नितीन देसाई नेहमी मला फोन करायचे. जेव्हा त्यांच्या मुलीचं लग्न होतं, तेव्हा त्यांनी मला आवर्जून बोलावलं होतं. त्यांनी त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला मला बोलवलं आहे. त्यांचं आणि माझं नातं फार वेगळं होतं, जवळचं नातं होतं. ते अजिबात दडपणाखाली नव्हते. तो खूप जॉली माणूस होता’.

तसेच मराठी दिग्दर्शक अभिजीत पानसे यांचीही प्रतिक्रियाही समोर आली आहे. ते म्हणाले कि, ‘मला खरंच काही सुचत नाहीये, अगदी गलबलायला झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून एका फिल्म स्कूलच्या कामासाठी माझं नितीन दादाशी बोलणं सुरू होतं. खूप मोठा माणूस आज आपल्यातून गेला आहे. आपल्या महाराष्ट्राचं, देशाचं, जनतेचं हे नुकसान आहेच पण वैयक्तिकदृष्ट्या माझंही खूप मोठं नुकसान झालं आहे. नितीन दादाने असं का केलं मला माहिती नाही, मला आत्ता खरंच काही सुचत नाहीये’.

अभिनेता सुबोध भावेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले कि, ‘प्रिय नितीन, तुझा बद्दल अभिमान आदर आणि प्रेम नेहमीच होतं आणि कायम राहील. पण तू इतकी टोकाची भूमिका का घेतलीस हा प्रश्न नेहमी छळत राहील. ज्या तणावातून तू जात असशील असा तणाव कोणाच्याही आयुष्यात न येवो. भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा!! कलाक्षेत्रातील तुझी जागा कोणीच भरून काढू शकत नाही. ओम शांती!!’

अभिनेता गश्मीर महाजनीने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नितीन देसाई यांना आदरांजली वाहिली आहे. नितीन देसाई यांचा फोटो शेअर करत गश्मीरने लिहिलंय, ‘भावपूर्ण श्रद्धांजली.. सरांच्या कुटुंबियांना या कठीण व दुःखद प्रसंगाला सामोरे जाण्यास शक्ति मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना’.

अभिनेता अमोल कोल्हेनेही सोशल मीडियावर दुःख व्यक्त करत लिहिलंय, ‘प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीनजी देसाई यांच्या दुर्दैवी निधनाची बातमी माझ्यासाठी अत्यंत धक्कादायक आहे. या बातमीवर अजिबात विश्वास बसत नाहीये. कला क्षेत्रातील माझ्या आजवरच्या प्रवासात मला लाभलेले नितीन दादांचे मार्गदर्शन आणि त्यांची साथ माझ्यासाठी खूप मोलाची ठरली आहे. ज्या ‘राजा शिवछत्रपती’ मालिकेत मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली, त्या मालिकेचे निर्माते नितीन दादाच होते. त्यांच्या अचानक जाण्याने मनात पोरके झाल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! देसाई कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, तसेच नितीन दादांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच आई-जगदंबेचरणी प्रार्थना!’

याशिवाय महेश मांजरेकर, आदेश बांदेकर, हेमांगी कवी, मिलिंद गुणाजी, मृणाल कुलकर्णी यांच्यासह कित्येक कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे.