ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर; CM शिंदेंची मोठी घोषणा


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ वर्षाचा मानाचा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल ट्विटरच्या माध्यमातून हि घोषणा केली आहे. आज अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर करताना एकनाथ शिंदे म्हणाले, ‘अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले त्यामुळेच त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे’.

ट्विटरवर हि घोषणा करताना लिहिलं आहे कि, ‘ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा #महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करतांना म्हटले आहे’.

दरम्यान, अशोक सराफ यांनी अनेक मराठी चित्रपटात काम केले. तसेच त्यांनी मालिकांमध्ये देखील मुख्य भूमिका तसेच सहकालाकाराची भूमिका साकारली. अशोक सराफ यांचा जन्म 4 जून 1947 साली झाला. अशोक सराफ यांना त्यांचे चाहते लाडाने अशोक मामा असे म्हणत. आपल्या अभिनयातून अशोक सराफ यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजवर त्यांनी, धुमधडाका, गंमत जंमत, अशी ही बनवाबनवी , नवरा माझा नवसाचा, आयत्या घरात घरोबा अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले.