‘ठरलं तर मग’मध्ये रंगणार कोर्ट रूम ड्रामा! महत्वाचा पुरावा सादर होणार; अर्जूनच्या हुशारीने महिपत अडकणार..?


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेचे कथानक, कलाकारांचे अभिनय आणि मालिकेत येणारे ट्विस्ट प्रेक्षकांना कायम मालिकेशी जोडून ठेवत आहेत. सध्या मालिकेत कोर्ट रूम ड्रामा भलताच रंजक ठरतो आहे. मधू भाऊंना निर्दोष मुक्त करण्यासाठी पुरावे शोधताना आता अर्जुनच्या हाती असा पुरावा लागला आहे ज्यामुळे महिपतचा खोटेपणा उघडकीस येणार आहे. नुकताच मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये अर्जुनच्या हुशारीपुढे महिपतचा खोटेपणा हरताना दिसतोय. हा प्रोमो चांगलाच व्हायरल झाला आहे.

एकीकडे अर्जुन महिपतचा खोटेपणा उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे, रविराज किल्लेदारांना एक साक्षीदार सापडतो. त्यामुळे कोर्टाच्या लढाईत चुरस निर्माण होते. पण आता मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना जो कोर्टरुम ड्रामा पाहायला मिळणार आहे तो फारच रंजक आहे. दरम्यान, रविराज किल्लेदार साक्षी शिखरेला निर्दोष ठरवण्यासाठी कोर्टात त्यांना सापडलेल्या साक्षीदाराला बोलावतात. तर, दुसरीकडे अर्जुनने मात्र महिपतचा खोटेपणा समोर आणून त्याला पूर्णपणे अडकवण्याची सगळी तयारी अगदी कंबर कसून केलेली असते. यावेळी रविराज किल्लेदारांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर अर्जुन मधुभाऊंच्या वतीने कोर्टासमोर बाजू मांडू लागतो. यावेळी अर्जून महिपतला असे काही प्रश्न विचारतो की त्याची बोलती बंद होते.

या प्रोमेमध्ये, अर्जुनच्या प्रश्नांची उत्तरं देताना महिपत तंतरल्याचे दिसत आहे. अर्जुनने सर्वांसमोर आपला खोटेपणा उघड केल्यामुळे महिपत संतापतो आणि कोर्टात कांगावा करत आरडा ओरडा करू लागतो. ‘ हे सगळं खोटं आहे.. असं तो म्हणू लागतो. इतक्यात अर्जुन त्याला ‘माझ्याकडे सगळे पुरावे आहेत..’ असं ठामपणे सांगतो आणि महीपतच्या चेहऱ्याचा रंग उडून जातो. मालिकेचा हा विशेष भाग येत्या १९ जानेवारी २०२४ रोजी रात्री साडेआठ वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आता अर्जुनच्या प्रयत्नांना यश येणार का..? महिपत खरंच पकडला जाणार का..? अर्जुनने जमवलेल्या पुराव्यांसोबत कुणी छेडछाड तर केली नसेल ना…? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आगामी भागात मिळणार आहेत.