‘महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांत..’; 100’व्या नाट्यसंमेलनात सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मोठी घोषणा


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकतीच सांगलीत १०० व्या नाट्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. संमेलनाच्या पहिल्याच दिवशी नाट्यगृहाची अवस्था आणि गरज यांबाबत चर्चा झाली असता प्रत्येक तालुकास्तरावर नाट्यगृह निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. इतकेच नव्हे तर, महाराष्ट्राला मिळालेला समृद्ध सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राज्यातील ३६ जिल्ह्यांत ७५ ठिकाणी सिने- नाट्यगृहे उभारण्याचा संकल्प आहे, असेही ते म्हणाले. दर्दी रसिकांची गर्दी आहे, तोपर्यंत नाटकाला ‘अच्छे दिन’ राहणारच, म्हणत त्यांनी हि घोषणा केली.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाची मुहूर्तमेढ नाट्यपंढरी येथील विष्णुदास भावे नाट्यविद्यामंदिरात रोवण्यात आली. यावेळी नाट्यपरिषदेचे सदस्य मुकुंद पटवर्धन यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर अभिषेक काळे, सुकृत ताह्मणकर, आर्या खाडिलकर, गायत्री कुलकर्णी, धनश्री गाडगीळ यांनी नांदी आणि स्वागत गीत सादर करीत संमेलनाची सुरुवात केली. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ, ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी आणि १०० व्या संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल उपस्थित होते. शिवाय सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रा. मिलिंद जोशी, मराठी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय गोखले यांच्यासह अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती होती.

याशिवाय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त सुनील पवार, मराठी प्रयोग परीनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय गोखले, नीता केळकर, राजाराम गरुड, सिद्धार्थ गाडगीळ, आदित्य पटवर्धन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शशांक लिमये यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सांगण्यात आले कि, पुढील ६ महिन्यात संमेलनाचे विविध कार्यक्रम होत राहतील. संमेलनात नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले म्हणाले कि, ‘४० वर्षांत अनेक नाट्यगृहांची दुरवस्था पाहिली. नाट्य परिषदेचा प्रमुख म्हणून सर्वांना एकत्र घेत नाट्यगृहे अधिकाधिक चांगली करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सांस्कृतिक संचालनालयाची यंत्रणा पूर्ण ताकदीने काम करीत आहे. प्रायोगिक असो वा व्यावसायिक नाटक ‘नाट्य’ हवंच. नवोदितांना मुंबईत राहण्यासाठी जागेचा भेडसावणारा प्रश्‍न निकालात काढण्यासाठी प्रयत्न करू. नाट्यगृहांवर सौरऊर्जा यंत्रणा बसवून निर्मात्यांची वाढत्या वीजबिलांची अडचण सोडवता येईल’.