दिग्पाल लांजेकरांच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा; ‘हे’ कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या चार आठवड्यापासून दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’मधील पाचवे पुष्प ‘सुभेदार’ प्रचंड गाजतो आहे. हा मराठी ऐतिहासिक चित्रपट बॉक्स ऑफीसवर तुफान यश मिळवत असताना दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी पुढील प्रोजेक्टची घोषणा केली आहे. या आगामी चित्रपटाची पहिली झलक देखील प्रेक्षकांसमोर आली आहे. ‘सुभेदार’नंतर आता दिग्पाल लांजेकर मराठवाडा मुक्तिसंग्राम मोठ्या पडद्यावर दाखवण्यास सज्ज झाले आहेत.

‘मुक्तिसंग्राम : कथा मराठवाड्याच्या संघर्षाची’ हा नाट्य माहितीपट असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्याचा मुहूर्त पार पडला आहे. सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांनी ‘मुक्तिसंग्राम : कथा मराठवाड्याच्या संघर्षाची’ या माहिती पाटाची निर्मिती केली आहे. ‘सुभेदार’ चित्रपटातून इतिहासातील एक सुवर्ण पान उलगडल्यानंतर आता या आगामी माहितीपटाच्या माध्यमातून दिग्पाल लांजेकर पुन्हा एकदा दिग्दर्शनाची सूत्र आपल्या हाती घेताना दिसणार आहेत. या माहितीपटाच्या काही खास वैशिट्ये शुभारंभावेळी सांगण्यात आली. त्यानुसार, ‘मुक्तिसंग्राम : कथा मराठवाड्याच्या संघर्षाची’ हा डॉक्यु ड्रामा प्रकार आहे. अर्थात उपलब्ध कागदपत्रे आणि नाट्य रूपांतर यांची योग्य पद्धतीने सांगड घालून हा माहितीपट तयार करण्यात आला आहे.

यासाठी सिलेक्टेड करस्पॉन्डन्स ऑफ सरदार वल्लभभाई पटेल, हैद्राबादचा स्वातंत्र्यसंग्राम आणि मराठवाडा या उपलब्ध पुस्तकांमधून संदर्भ घेत त्यांचा सखोल अभ्यास करून संहिता लिहिली आहे. शिवाय ब्रिटिशकालीन वृत्तवाहिन्यांवरील मूळ उपलब्ध व्हिडिओंचा अभ्यास करून त्याचा योग्य पद्धतीने वापर केला आहे आणि केवळ १२ दिवसात हा ७५ मिनिटांचा माहितीपट तयार करण्यात आला आहे. माहितीनुसार, ‘मुक्तिसंग्राम : कथा मराठवाड्याच्या संघर्षाची’ या माहितीपटात अभिनेता अक्षय वाघमारे – नागनाथ परांजपे आणि अभिनेत्री पूजा पुरंदरे ताराबाई परांजपे यांची भुमिका साकारणार आहेत.