हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही महिन्यांमध्ये मनोरंजन सृष्टीने अनेक दिग्गज कलाकार मंडळींना गमावले आहे. अलीकडेच सुलोचना दीदी यांचेही निधन झाले आणि संपूर्ण सिने विश्व शोक सागरात बुडाले होते. अशातच आता पुन्हा एकदा मराठी मनोरंजन विश्वातील आणखी तारा निखळला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण राजा कारळे यांचे आज सकाळी पुण्यात निधन झाल्याचे हे वृत्त आहे. त्यांच्या निधनाची वार्ता मनोरंजन विश्वात समजताच अनेक कलाकार मंडळींनी शोक व्यक्त केला आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण राजा कारळे यांच्या निधनामुळे मनोरंजन सृष्टीत शोक व्यक्त केला जात आहे. चित्रपट दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचे दिनांक २३ जून २०२३ रोजी सकाळी पुण्यात निधन झाले. नामांकित माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आज सकाळी १० वाजण्याच्या पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात दिग्दर्शक प्रवीण राजा कारळे यांचे दुःखद निधन झाले’. मनोरंजन सिनेसृष्टीत प्रवीण कारळे यांनी दिग्दर्शक म्हणून मोठे नाव कमावले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या काही कलाकृती प्रेक्षकांच्या मनात घर करून बसल्या आहेत.
प्रवीण कारळे यांच्याबद्दल विशेष सांगायचे म्हणजे, ते सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट समीक्षक राजा कारळे यांचे चिरंजीव होते. वयाच्या चौथ्या वर्षातच त्यांनी रंगभूमीवर एक कलाकार म्हणून पदार्पण केले होते. प्रवीण यांना कलेचे जणू बाळकडू मिळाले होते. अगदी लहानपणापासूनच त्यांनी चित्रपटसृष्टीतील बारकावे आणि खोल समजून घेतला. यामुळे ‘बोकड’, ‘भैरू पैलवान की जय’, ‘मानसन्मान’, ‘माझी आशिकी’, ‘हृदयात समथिंग समथिंग’ अशा दर्जेदार कलाकृती ते सिने सृष्टीला देऊ शकले.