‘श्रद्धा आणि अंधश्रद्धा या विषयावर…’; ‘पंचक’ चित्रपटाच्या संकल्पनेवर दिग्दर्शकांनी मांडले स्पष्ट मत


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने निर्मित ‘पंचक’ हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. घरात पंचक लागल्याने आता कोणाचा नंबर लागणार..? याची भीती घरातील सर्वांनाच भेडसावत असतानाच प्रत्येक जण आपापल्यापरीने यावर उपायही शोधतोय. या सगळ्यात कोणाची सर्कस सुरू आहे तर कोणाचा ऑपेरा सुरु आहे. आता खोतांच्या घराला लागलेले ‘पंचक’ कसे सुटणार..? हे येत्या नव्या वर्षात म्हणजेच ५ जानेवारी २०२४ रोजी समजणार आहे. अलीकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाच्या रिलीजबाबत आणखीच उत्सुकता आहे.

एक वेगळे कथानक असल्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहेत. दरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल आवटे म्हणाले, कि, ’श्रद्धा आणि अंधश्रद्धा याविषयावर या चित्रपटातून ज्ञान देण्याचा आमचा अजिबात हेतू नाही. आम्ही फक्त एक निखळ मनोरंजन करणारी कथा प्रेक्षकांसमोर मांडत आहोत. एका घरात एखादी घटना घडते आणि त्यातून निर्माण झालेल्या भीतीमुळे आपोआपच होणारे विनोद, अशी ‘पंचक’ची संकल्पना आहे. चार्ली चॅप्लिनच्या म्हणण्यानुसार ‘लाईफ इज अ ट्रजिडी इन क्लोज अप, बट अ कॅामेडी इन लाँग शॅाट, हा चित्रपट अगदी तसाच आहे. जेव्हा आम्ही तो लिहिला तेव्हा त्या पात्रांसाठी ती भीती होती परंतु प्रेक्षकांसाठी ही धमाल आहे’.

तर दिग्दर्शक जयंत जठार म्हणतात, ‘’खरं सांगायचे तर ही कथा माझ्या आयुष्यात घडली होती. सुरूवातीला खूप भीती वाटायची. परंतु कालांतराने त्याची मी मजा घ्यायला लागलो आणि त्यातूनच मला हा विषय सुचला. आता हा कल्लोळ पाहाताना प्रेक्षकांनाही मजा येणार आहे. माझ्या दिग्दर्शनाच्या पदार्पणातच मला माधुरी दिक्षित नेने आणि डॅा, श्रीराम नेने यांच्यासारखे निर्माते लाभले, यातच सगळे आले. या चित्रपटात अतिशय नामवंत कलाकार आहेत. त्यामुळे कागदावरील हा ‘पंचक’ आता लवकरच पडद्यावर झळकणार आहे.’’