हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीवर ‘बाळुमामाच्या नावानं चांगभलं’ हि अध्यात्मिक मालिका सुरु आहे. या मालिकेतून संत बाळूमामा यांच्या अलौकिक कथांचे कथन केले जात आहे. या मालिकेचा प्रेक्षक वर्ग फार मोठा आहे. अशातच नुकताच मालिकेच्या सेटवर कलाकरांना दैवी चमत्काराची अनुभूती आली आहे. याचा व्हिडीओ मालिकेत बाळुमामांची भुमिका साकारणारा अभिनेता सुमीत पुसावळे याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्राच्या माध्यमातून शेअर केला आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
‘बाळुमामाच्या नावानं चांगभलं’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली असून पहिल्या एपिसोडपासूनच प्रेक्षकांचा चांगला कल राहिला आहे. या मालिकेत बाळूमामांची भूमिका साकारणाऱ्या सुमीतने शूटिंग सेटवर आलेल्या दैवी अनुभवाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीमध्ये कलर्स मराठीच्या ‘बाळुमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेचे शूटिंग सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईत पावसाला सुरुवात झाली आणि या दरम्यान सेटवर फिल्मसिटीच्या भागातही मुसळधार पाऊस सुरु झाला. ज्यामुळे शुटींग थांबले होते. दरम्यान ज्या ठिकाणी बाळुमामांचा तळ दाखवण्यात आला आहे त्या भागात एक असा चमत्कार घडला जो पाहून सगळेच थक्क झाले.
मालिकेत ज्या ठिकाणी बाळूमामांचा तळ दाखवण्यात आला आहे त्या मोकळ्या जागेत असल्याने पावसामुळे अगदी पाणी पाणी झालं होत. चिखल झाला होता. संपूर्ण परिसर पूर्ण भिजूनदेखील शुटींग वेळी तळात एक दिवा मात्र कायम तेवताना दिसला. पावसाच्या जोरदार सरी कोसळत असतानादेखील हा दिवा मात्र अखंड तेवत होता आणि याच प्रसंगाचा व्हिडीओ सुमितने सोशली मीडियावर शेअर केला आहे. जो पाहून अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. सुमितने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून काहींनी तो जुना असल्याचे म्हटले आहे. कारण यापूर्वीही सुमीतने हा व्हिडीओ पोस्ट केला होता. तोच व्हिडीओ आता यंदाच्या पावसाळयात पुन्हा रील म्हणून शेअर केला आहे. याशिवाय काहींनी हा व्हिडीओ पाहून ‘खरोखरच तुमच्यावर बाळूमामांचा आशीर्वाद आहे’ असे म्हटले आहे.