किती काळ काठावर उभं राहून, नावं ठेवायची..?; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा BJP’मध्ये प्रवेश


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतदेखील अनेक अडचणी आहेत. ज्यांचा सामना कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते, दिग्दर्शक आणि कला विश्वाशी संबंधित प्रत्येक व्यक्ती करत असतो. काही समस्या या उघड दिसतात तर काही समस्या अप्रत्यक्षरीत्या त्रास देत असतात. यामुळे कलाविश्वातील बरीच दिग्गज मंडळी ही अभिनय विश्वासोबतच राजकीय क्षेत्रातही सक्रिय आहेत. यामध्ये प्रशांत दामले, सुशांत शेलार, मंगेश देसाई, रमेश परदेशी, प्रिया बेर्डे, हार्दिक जोशी, दीपाली सय्यद आणि अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे.

अशातच नुकताच आणखी एक मराठमोळा अभिनेता राजकीय क्षेत्रात उतरला आहे. मराठी मालिका तसेच चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारलेला अभिनेता अभिजित केळकर याने नुकताच भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. अभिनेत्री प्रिया बेर्डे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अभिजीतने भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. याबाबत त्याने सोशल मीडियावर माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये त्याने पक्षप्रवेशावेळचे काही फोटोदेखील शेअर केले आहेत.

या फोटोंसोबत अभिजीतने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश As they say, you have to be in the system to change it… … किती काळ काठावर उभं राहून, नावं ठेवायची..? त्या प्रवाहात सामिल होऊन, समजून घेऊन, काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया’. अभिजीतने आज रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर ही बातमी आपल्या चाहत्यांसह शेअर केली आहे. अभिजीतने शेअर केलेल्या या फोटोत त्याच्यासोबत अभिनेत्री प्रिया बेर्डे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिसत आहेत. या फोटोत बावनकुळे अभिजीतला पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत करताना दिसत आहेत