‘भारावलेल्या अवस्थेत मी त्या मूर्तीकडे पाहिलं आणि…’; प्रसाद ओकची ‘ती’ पोस्ट व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसाद ओक हे मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय नाव आहे. प्रसाद ओक सध्या आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक असून त्यांचा चाहता वर्ग वाढताना दिसतो आहे. एक उत्तम अभिनेता, दिग्दर्शक, लेखक म्हणून गेल्या काही काळात प्रसाद ओकने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. प्रसादच्या भेटीसाठी त्याचे चाहते कायम प्रयत्न करत असतात. अशीच काही चाहत्यांसोबत घडलेल्या भेटीचा अनुभव प्रसाद ओक यांनी शेअर केला आहे.

या पोस्टमध्ये प्रसाद ओकने दोन फोटो शेअर केले आहेत. यातील पहिल्या फोटोत विठु माऊली दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत प्रसादच्या हातात विठुरायची मूर्ती दिसत आहेत. या पोस्टसोबत प्रसादने लिहिलंय, ‘आज अचानक पॅकअप नंतर कपडेपट करणारा आमचा संतोष जगताप व्हॅनिटी वॅनमध्ये आला आणि म्हणाला, “दादा… माझे काही मित्र पंढरपुरातून इथे सांगलीत स्पेशल गाडी करुन फक्त तुला भेटायला आलेत… त्यांना ५ मिनिटं देशील का?” मी म्हटलं बोलाव… त्यानंतर नवनाथ गायकवाड आणि त्यांचे २/३ मित्र अशी काही मंडळी आली… काही कळायच्या आत एकाने मला फेटा बांधला… दुसऱ्याने गळ्यात हार घातला… आणि तिसऱ्याने म्हणजे नवनाथ नी ही सुंदर मूर्ती माझ्या हातात ठेवली… आणि सगळे जाऊ लागले… मी म्हणालो “एवढ्याचसाठी आला होतात?” त्यावर ते म्हणाले “हो दादा… वाटलं ही मूर्ती तुमच्या हातात द्यावी.. बास..” आणि सगळे क्षणार्धात… मला आभार मानण्याची संधीही न देता निघून गेले’.

‘मला खरंच कळत नाही कधी कधी की या अशा निर्लेप, निखळ, निरपेक्ष प्रेमाचं उतराई कसं व्हायचं? या जिव्हाळ्याचं, या आपुलकीचं काय करायचं? सध्या चालू असलेलं काम म्हणजे खरोखरच एक “अवघड वाट” आहे… पुढच्या कामांचंही मनात दडपण आहे… अशा वेळी कुठं चुकलो तर? म्हणून मला “संगत” द्यायला आला असावा की काय तो? या अशाच भांबावलेल्या आणि भारावलेल्या अवस्थेत मी त्या मूर्तीकडे पाहिलं आणि त्या क्षणी “धर्मवीर” मध्यले आमच्या संगीता ताई बर्व्यांनी लिहिलेले शब्द आठवले…संगतीनं ओलांडला अवघड घाट…चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट…तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट… सुख दुःख एका मेका वाटलं वाटलं…. भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल…!!!”