वाघाच्या जबड्यात घालुनी हात मोजितो दात!!! ‘शिवरायांचा छावा’ येतोय; फर्स्ट लूकने वाढवली उत्सुकता


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उभ्या महाराष्टाचे आद्यदैवत हे काही वेगळे सांगायची गरज नाही. नुसतं छत्रपती म्हटलं कि डोळ्यासमोर शिवरायांचा आणि त्यांच्या मावळ्यांचा जाज्वल्य इतिहास उभा राहतो. मराठी सिनेविश्वातील अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारलेले चित्रपट तयार केले आहेत. या ऐतिहासिक चित्रपटांना कायम प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. दरम्यान दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच या सिनेमाचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी श्री शिवराज अष्टकमधील सहाव्या सिनेमाची घोषणा केल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाचे नाव ‘शिवरायांचा छावा’ असे आहे. नुकताच शिवरायांचा ‘छावा’ या ऐतिहासिक चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमावर आधारलेला आहे. अक्षरशा अंगावर काटा आणणारा असा हा फर्स्ट लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करताना दिग्पाल यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘वाघाच्या जबड्यात घालुनी हात मोजितो दात…‘शिवरायांचा छावा, १६ फेब्रुवारी २०२४ पासून फक्त चित्रपटगृहात!’

सोशल मीडियावर हे पोस्टर तुफान व्हायरल झाले असून ‘तो’ अभिनेता कोण आहे..? याबाबत चर्चा सुरु आहे. हे पोस्टर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. ए. ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट प्रस्तुत ‘शिवरायांचा छावा’ची निर्मिती मल्हार पिक्चर्स कं.चे वैभव भोर, किशोर पाटकर आणि मधू यांनी केली आहे. तर या चित्रपटाची पटकथा आणि संवाद दिग्पाल लांजेकर यांनी लिहिले आहेत आणि गाणीदेखील त्यांचीच आहेत. या गाण्यांना युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी संगीत दिलं असून पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. हा चित्रपट येत्या नववर्षात १६ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.