हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिने विश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक म्हणजे प्रसाद ओक. माध्यमातून कायमी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रसाद सिने विश्वात आपल्या कलेच्या जोरावर घट्ट पाय रोवून उभा आहे. त्यामुळे त्याचा चाहता वर्ग फार मोठा आहे. जो त्याला नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहण्यासाठी उत्सुक असतो. लवकरच प्रसाद एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि या चित्रपटाचे ‘परिनिर्वाण’ असे आहे. या चित्रपटातील प्रसादच्या भूमिकेची एक हलकी झलक सोशल मीडियावर पहायला मिळाली आहे.
अभिनेता प्रसाद ओक याने अधिकृत सोशल मीडिया हॅन्डल इंस्टाग्रामवर ‘परिनिर्वाण’ चित्रपटाशी संबंधित एक व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडीओसोबत प्रसादने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘वंदनीय बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन करुन “परिनिर्वाण” ची तयारी सुरु झालेली आहे. मोठ्ठया जबाबदारीची जाणीव झालेली आहे. महामानवाचा आशीर्वाद पाठीशी आहेच. तुमच्या शुभेच्छांची आणि प्रेमाची गरज आहे…!!!’ या चित्रपटात प्रसाद ओक मुख्य भूमिकेत दिसणार आहे आणि त्याच्या या भूमिकेची एक झलक या व्हिडिओत दिसली आहे. पांढरं धोतर त्यावर आकाशी रंगाचा सदरा आणि हातात छायाचित्र टिपणारा कॅमेरा.. या व्हिडिओत प्रसादचा असा काहीसा लूक दिसतो आहे.
अभिनेता प्रसाद ओक साकारत असलेल्या भूमिकेचे नाव नामदेव व्हटकर असे आहे. ज्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची परिनिर्वाण यात्रा अजरामर केली तेच हे नामदेव व्हटकर. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची परिनिर्वाण महायात्रा केवळ चित्रीकरणाच्या उद्देशाने नामदेव व्हटकर यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली होती. यामुळे त्यांच्याकडे या महायात्रेचे दुर्मिळ चित्रीकरण होते. नामदेव व्हटकर यांच्यामुळे महामानवाला निरोप देण्यासाठी जमलेल्या जनसमुदायाच्या मानवी सागराचे दुर्मिळ फोटो आज आपण पाहू शकतो. नामदेव व्हटकर हे केवळ छायाचित्रकार नव्हते. तर ते लेखक, संगीतकार, कुशल प्रशासक, लोककलेचे अभ्यासक, प्रगतीशील शेतकरी, स्वातंत्र्य सैनिक आणि जागरूक आमदारही होते.