‘सुस्साट’ घेऊन येतोय अद्भुत भुतांची बेफाट कॉमेडी; सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वात दगडू म्हणून कल्ला घातलेला प्रथमेश परब, एनर्जीचं कम्प्लिट पॅकेट असलेला आपला सिद्धू म्हणजेच सिद्धार्थ जाधव आणि ‘जीव झाला येडा पिसा’ मालिकेतून प्रकाशझोतात आलेली विदुला चौघुले हे तिघे पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. सिद्धू, प्रथमेश आणि विदुला लवकरच मराठी होणार कॉमेडी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘सुस्साट’ असे आहे. नुकताच या चित्रपटाच्या शूटिंगचा श्रीगणेशा झाला आहे. सोबतच चित्रपटाचे पोस्टर देखील रिलीज करण्यात आले आहे.

अमेय विनोद खोपकर एन्टरटेन्मेंट, ए बी इंटरनॅशनल, मर्ज एक्स आर स्टुडिओ आणि डीएनए पिक्चर्स ‘सुस्साट’ हा एक धम्माल हॉरर कॉमेडी चित्रपट घेऊन येत आहेत. लंडनमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले आहे. या चित्रपटाचे लेखन अंबर विनोद हडप यांनी केले आहे. तर विशाल देवरुखकर यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी घेतली आहे. चित्रपटात सिद्धार्थ जाधव, प्रथमेश परब आणि विदुला चौघुले यांच्यसह विजय केंकरे, शुभांगी लाटकर या कलाकारांच्याही महत्वपूर्ण भूमिका असणार आहेत.

या चित्रपटाच्या कथानकात मनोरंजनाचा मसाला लेखकाने पूर्ण भरला आहे. यात एका जुनाट प्रथेचा धमाल पद्धतीने पर्दाफाश होणार आहे. ‘सुस्साट’च्या पोस्टरमध्ये सिद्धू आणि प्रथमेश एका स्त्रीच्या सावलीत उभे दिसत आहेत. समोर ‘भीतीचा गंमतीदार खेळ’ असे लिहिलेले नो एंट्री बॅज दिसत आहे. ‘सुस्साट’ची निर्मिती अमित बसनीत, प्रजय कामत आणि स्वाती खोपकर करत आहेत. तर चित्रपटाचे सह- निर्माते निनाद नंदकुमार बत्तीन, तबरेज पटेल, सनिस खाकुरेल आहेत. छायाचित्रण योगेश कोळी करणार असून चित्रपटाचे संगीत कुणाल करण यांच्या हाती आहे. सध्या ‘सुस्साट’ चित्रपटाचं चित्रीकरण लंडन मध्ये सुरू झालं आहे. पोस्टर पाहून चित्रपटाबाबत असणारी उत्सुकता आपसूकच वाढली आहे.