अभिनेता गिरीश परदेशी घेऊन आलेत ‘गुरुदक्षिणा’; बॉलिवूड शैलीत गाजवणार प्रायोगिक रंगभूमी


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नाटक हे मनोरंजनाचे एक महत्वपूर्ण माध्यम आहे. या माध्यमातून प्रेक्षक आणि कलाकार एकमेकांशी थेट कनेक्ट होतात. त्यामुळे मनोरंजनाची साधने आधुनिक होताना रंगभूमी देखील प्रगती करत राहिली. आज रंगभूमीवर अनेक मराठी, हिंदी, गुजराथी आणि विविध भाषेतील नाटकं पहायला मिळत आहेत. काही प्रायोगिक तर काही व्यावसायिक नाटके प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. अशीच एक आगळी वेगळी प्रायोगिक नाट्य कलाकृती घेऊन प्रसिद्ध मराठी अभिनेते गिरीश परदेशी आपल्या भेटीसाठी सज्ज झाले आहेत.

या नाटकाचे नाव ‘गुरु दक्षिणा’ असे आहे. मराठी साहित्यिक द. मा. मिरासदार लिखित ‘व्यंकूची शिकवणी’ या विनोदी कथेवर हे नाटक आधारलेले आहे. मिरासदार यांची ६०’च्या दशकात लिहिलेली आणि अत्यंत गाजलेली अशी ही कथा. ज्यावर ‘गुरुकृपा’ हा मराठी चित्रपटदेखील काढण्यात आला होता. यानंतर आता क्रिशिव क्रिएशन्स या नाट्य संस्थेतर्फे, द. मा. मिरासदार यांच्या ‘व्यंकूची शिकवणी’ या कथेवर आधारित ‘गुरु दक्षिणा’ हे हिंदी नाटक प्रायोगिक रंगभूमीवर येण्यास सज्ज झाले आहे. विशेष सांगायचे म्हणजे हे पूर्णपणे बॉलीवूड शैलीमध्ये रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

‘गुरु दक्षिणा’ या बॉलिवूड शैलीतील हिंदी नाटकाचा पहिला प्रयोग येत्या ४ नोव्हेंबर २०२३ रोजी, शनिवारी संध्याकाळी ६ वाजता भरत नाट्य मंदिर, पुणे येथे पार पडणार आहे. या नाटकाचे दिग्दर्शन अन हिंदी अनुवाद मराठी अभिनेता गिरीश परदेशी यांनी केले असून रूपांतर तेजस इंदापूरकर यांनी केले आहे. या नाटकाला प्रथमेश कानडे यांचे संगीत लाभले आहे. तर प्रकाश योजनेची जबाबदारी तन्मय महाजन यांनी पेलली आहे. तसेच नृत्य दिग्दर्शनाची बाजू क्षितिजा ब्रह्मे यांनी सांभाळली आहे.