‘भद्रकाली’ची 59 वी क्रेझी कलाकृती येतेय प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ दिवशी होणार शुभारंभ


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी नाटक आणि रसिक प्रेक्षकांचे अत्यंत खास नाते आहे. या माध्यमातून प्रेक्षक आणि कलाकार थेट कनेक्ट होत असतात. त्यामुळे चित्रपटांइतकाच नाटकांचा देखील मोठा प्रेक्षकवर्ग आहे. रंगभूमीवर सातत्याने होणारे नवनवीन प्रयोग हे प्रेक्षकांसाठी खास मनोरंजनाची पर्वणी ठरतात. आताही अशीच मनोरंजनाने परिपूर्ण खुमासदार शैलीतील नवी नाटिका प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाली आहे. ‘माझ्या बायकोचा नवरा’ असे या नाटकाचे नाव असून लवकरच त्याच शुभारंभ होणार आहे.

‘माझ्या बायकोचा नवरा’ हि प्रसाद कांबळी यांच्या भद्रकाली प्राॅडक्शन्सची ५९ वी धमाकेदार नाट्यकृती आहे. जी लवकरच रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज झाली आहे. या नाटकाचा शुभारंभ प्रयोग येत्या रविवारी म्हणजेच २४ डिसेंबर २०२३ रोजी रंगणार आहे. मुंबईतील आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण येथे हा शुभारंभ प्रयोग पार पडणार आहे. या नाटकाच्या निमित्ताने अभिनेत्री अनिता दाते, अभिनेता सागर देशमुख आणि पुष्कराज चिरपुटकर हे नवं त्रिकुट प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे.

या धमाल विनोदी नाटकाची निर्मिती श्रीमती कविता मच्छिन्द्र कांबळी, दिनू पेडणेकर, अभिजित देशपांडे, राहुल कर्णिक यांनी केली आहे. तर या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन सागर देशमुख यांनी केले आहे. ‘माझ्या बायकोचा नवरा’ या नाटकाच्या शीर्षकातने रसिक प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधलं आहे. अत्यंत धमाल आणणारे हे विनोदी नाटक नवरा बायकोच्या नात्यावर आधारलेले आहेच पण या नात्यातली असुरक्षितता आणि चिरंतर प्रेमाबद्दलदेखील हे नाटक बोलणार आहे. त्यामुळे नाटकाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता आणखीच वाढत चालली आहे.