हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नागराज पोपटराव मंजुळे यांचा २०१८ साली प्रदर्शित झालेला ‘नाळ’ सुपरहिट चित्रपट ठरला. राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या या चित्रपटाची प्रेक्षकांशी नाळ जोडली गेली. ‘चैत्या’चे बोबडे बोल सगळ्यांनाच भावले, गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली. आता ‘नाळ भाग २’ प्रदर्शनाच्या वाटेवर असतानाच या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे.
‘भिंगोरी’ असे गाण्याचे बोल असून ए. व्ही. प्रफुल्लाचंद्रा यांचे संगीत लाभलेल्या या गाण्याला वैभव देशमुख यांनी शब्दबद्ध केले आहे. तर या सुरेल गाण्याला मास्टर अवन, कडूबाई खरात, मनीष राजगिरे आणि नागेश मोरवेकर यांचा आवाज लाभला आहे. झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित, सुधाकर रेड्डी यक्कंटी दिग्दर्शित ‘नाळ भाग २’ १० नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘नाळ’मध्ये विदर्भातल्या नदीचं विस्तीर्ण पात्र दिसलं होतं. त्या पात्रात पाणी कमी, आणि वाळवंट जास्त होतं. असं असूनही पडद्यावर विदर्भ कधी नव्हे इतका विलोभनीय दिसला होता. ती कमाल होती सुधाकर रेड्डी यक्कंटी यांच्या कॅमेराची.
तर अशा रखरखीत वातावरणातही माया करणाऱ्या माणसांच्या सावलीत चैतू घडत होता. आता ‘नाळ २’ मध्ये मोठा झालेला चैतू आपल्या खऱ्या आईला भेटायला पश्चिम महाराष्ट्रात आलाय. ‘भिंगोरी’ या गाण्यातून नजरेत भरतं ते पश्चिम महाराष्ट्रात डोंगररांगांनी वेढलेल्या गावाचं निसर्गसौंदर्य आणि या गावात आलेल्या चैतूला बघून आनंदी झालेले गावकरी. निसर्गाचं हिरवंगार रुप आणि गावकऱ्यांचं प्रेम बघून भारावलेला चैतू खऱ्या आईला बघतो, पण इथून पुढे त्याच्या हा प्रवास नेमका कुठवर जातो ती कहाणी चित्रपटात बघायला मिळेल.