हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सुवर्ण इतिहासातील अत्यंत महत्वाचे असे पान उलघडत छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशोगाथा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणारे प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर त्यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’मूळे प्रचंड चर्चेत आहेत. या श्री शिवराज अष्टकातील ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ या चार ऐतिहासिक चित्रपटांच्या भव्य यशानंतर आता पाचवे चित्रपुष्प ‘सुभेदार’ची प्रतीक्षा आहे. हा चित्रपट नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वीर पराक्रमावर आधारित असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे.
‘सुभेदार’ या चित्रपटातील पहिले गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. याबाबत प्रसिद्ध मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर याने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. सोबतच आनंदाची बातमी जाहीर केली. या विडिओ पोस्टसोबत चिन्मयने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘१८ ऑगस्टला गाजणार सिंहगडाचा पोवाडा..
सह्याद्रीला आज येतीया जाग,
दख्खनचा गर्व ह्ये शिवाजी राजं..
सादर आहे सुभेदार मधील पहिलं वहिलं, आपल्या सर्वांचं गाणं ‘मावळं जागं झालं रं..’!
या व्हिडीओच्या शेवटी ‘सुभेदार’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख १८ ऑगस्ट असल्याचे सांगितले आहे. यापूर्वी हा चित्रपट २५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र आता त्याच्या प्रदर्शनाची तारीख बदलून १८ ऑगस्ट २०२३ अशी करण्यात आली आहे. सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाची तुफान चर्चा सुरु आहे. अलीकडेच या चित्रपटाचे एक पोस्टर प्रदर्शित झाले. ज्यामध्ये तानाजी मालुसरेंच्या कुटुंबाची झलक पहायला मिळाली. या चित्रपटात अभिनेते अजय पुरकर हे तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत तर त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंची भूमिका अभिनेत्री स्मिता शेवाळे साकारताना दिसणार आहेत. तसेच सूर्याजी मालुसरेंच्या भूमिकेत अभिजीत श्वेतचंद्र आणि त्यांच्या पत्नीची म्हणजे यशोदाबाईंची भूमिका अभिनेत्री शिवानी रांगोळे साकारत आहे. शिवाय सुभेदारांचा मुलगा रायबाच्या भूमिकेत अर्णव पेंढारकर दिसत आहे.