‘पुन्हा एकदा तोच प्रवास…’; वडिलांच्या मृत्यूनंतर गश्मीर ऐतिहासिक भूमिकेतून करणार कमबॅक


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिनांक ११ जुलै २०२३ हा दिवस संपूर्ण मराठी सिनेसृष्टीला हादरा देणारा दिवस ठरला. या दिवशी प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या अकस्मात निधनाच्या बातमीने मोठा धक्का दिला. रवींद्र महाजनी यांचा मुलगा अभिनेता गश्मीर महाजनी याला आपल्या वडिलांच्या निधनाची कल्पना नसल्याचे समोर आल्यानंतर टीकांचा तीव्र मारा त्याला सहन करावा लागला. वडिलांच्या निधनानंतर त्याच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याचे त्याने सांगितले होते. यानंतर आता लवकरच गश्मीर एका ऐतिहासिक भूमिकेतून सिनेविश्वात कमबॅक करणार असल्याचे समोर आले आहे.

https://www.instagram.com/reel/CwqRnU4NCdZ/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनी हा गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. गश्मीरचे वडील रविंद्र महाजनी यांचं निधन झाल्यानंतर त्याच्यावर वारंवार टीका झाल्या. ट्रोलिंग दरम्यान गश्मीरच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला होता. पण आता या संपूर्ण परिस्थितीतून सावरत गश्मीर मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. याबाबत त्याने स्वतःच सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करत चाहत्यांना माहिती दिली. गश्मीर पुन्हा एका ऐतिहासिक भुमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करणार असल्याचे समोर आले आहे.

अभिनेता गश्मीर महाजनी याने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं आहे की, ‘पुन्हा एकदा तोच प्रवास… लवकरच …’. गश्मीरने शेअर केलल्या व्हिडिओत वेगवेगळे फोटो आपण पाहू शकतो. ज्यामध्ये गश्मीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमध्ये दिसतोय. मात्र यामध्ये त्याने कुठेही आगामी प्रोजेक्ट, चित्रपटाचे नाव सांगितलेले नाही. तसेच यात गश्मीरच्या वाट्याला कोणती भुमिका आली आहे हे देखील सांगता येणार नाही. मात्र काहींनी कमेंटमध्ये गश्मीरला छत्रपती संभाजी महाराजांच्या भुमिकेत पहायचे आहे, अशीच इच्छा व्यक्त केली आहे.