‘ते माझे वडील आणि माझ्या आईचे पती होते..’; महाजनींच्या निधनानंतर झालेल्या ट्रोलिंगवर गश्मीरची प्रतिक्रिया


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवंगत ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनवार्तेने अद्याप मराठी सिनेसृष्टी धक्क्यात आहे. शनिवारी १५ जुलै २०२३ रोजी पुणे जिल्ह्यातील आंबी गावात राहत्या फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून रवींद्र महाजनी हे या फ्लॅटमध्ये एकटेच राहत असल्याचे समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. रवींद्र महाजनी यांचा मृतदेह सापडण्याचा ३ दिवस आधीच त्यांचे निधन झाल्याचे पोलिसांनी सांगितले होते. हि माहिती समोर येताच सोशल मिडीयावर रवींद्र महाजनी यांचा मुलगा आणि अभिनेता गश्मीर महाजनी याला ट्रोल करण्यात आले. यावर आता गश्मीरची पहिली प्रतिक्रिया पोस्टच्या माध्यमातून समोर आली आहे.

एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचे निधन अशा पद्धतीने व्हावे हि अत्यंत दुर्दैवाची बाब आहे, असे म्हणत अनेक नेटकऱ्यांनी गश्मीरवर टीका करायला सुरुवात केली. त्याच्या काही फोटोंवर कमेंट बॉक्समध्ये ट्रोलिंगचं वावटळ पहायला मिळालं. ‘तू एक मुलगा म्हणून कमी पडला आहेस’, ‘वडील एकटे होते.. त्यांची काळजी नव्हती का तुला..?’, ‘तुझी हिरोगिरी काय कामाची..? तुला वडिलांचा धड सांभाळ करता आला नाही’, ‘तुझे वडील एकटेच होते.. ते गेले आणि तू काय मुंबई फिरत बसलायस..? लाज नाही वाटत का..?’ या आणि अशा अजून बऱ्याच संतापजनक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या. मात्र तरीही गश्मीर अद्याप गप्प होता. अखेर त्याच्या दुःखाच्या वेळी त्याला आधार देण्याऐवजी वाढत चाललेल्या टीका पाहून त्याचाही संयम सुटला आणि त्याने एक पोस्ट शेअर करत या ट्रोलिंगवर उत्तर दिले आहे.

दिवंगत अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मुलगा आणि अभिनेता गश्मीर महाजनी याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिले आहे कि, ‘अभिनेता हा कायमच अभिनेता असतो. या प्रकरणानंतर मी, माझ्या कुटुंबाने, जवळच्या व्यक्तींनी मौन बाळगणं पसंत केलं. आम्ही शांत राहिल्याने अनेक जण द्वेष करत आहेत, शिव्याही देत आहे आणि आम्ही त्याचंही स्वागतच करतो. आपल्यातून निघून गेलेल्या त्या आत्म्याला देव शांती देवो. ओम शांती. ते माझे वडील होते आणि माझ्या आईचे पती होते. आम्ही त्यांना तुमच्या सर्वांपेक्षा जास्त चांगलं ओळखतो. मी याबद्दल भविष्यात कधीतरी वेळ आल्यावर नक्कीच बोलेनच’. रवींद्र महाजनी यांच्या पश्चात त्यांची पत्नी माधवी, मुलगा गश्मीर आणि मुलगी रश्मी आहेत. गश्मीर हा त्याची पत्नी, मुलगा आणि आपल्या आईसोबत मुंबईत राहतो. गश्मीरने हि पोस्ट शेअर केल्यानंतर ट्रोलिंगला कुठेतरी पूर्णविराम लागेल अशी आशा आहे.