हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या महिन्यात १५ जुलै रोजी मराठी मनोरंजन क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाचे वृत्त समोर आले आणि संपूर्ण सिनेविश्व शोकसागरात बुडाले. पुण्यातील फ्लॅटमध्ये महाजनी यांचा मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून ते एकटेच एकांतवासात राहत असल्याने त्यांच्या निधनाची कुणालाच माहिती नव्हती. अगदी त्यांच्या कुटुंबाला देखील त्यांच्या निधनाबद्दल काहीच माहित नव्हते. दुर्गंधी पसरल्यानंतर शेजाऱ्यांनी तक्रार केली असता पोलिसांना तपासादरम्यान त्यांचा मृतदेह आढळून आला. यावरून रवींद्र महाजनींचा मुलगा अभिनेता गश्मीर महाजनी ट्रोल झाला. ज्यावर त्याने कोणतीच उद्रेकी प्रतिक्रिया दिली नाही.
गश्मीर महाजनीने वडिल रवींद्र यांच्या निधनानंतर सोशल मीडियापासून काही काळासाठी ब्रेक घेतला होता. यानंतर आता बऱ्याच दिवसांच्या कालावधीनंतर गश्मीरने एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये गश्मीरने स्वतःचे काही फोटो शेअर केले आहे. त्यासोबत हास्यावर आधारित एक अत्यंत लक्षवेधी असे कॅप्शन लिहिले आहे. गश्मीरने लिहिलंय कि, ‘हास्य… आयुष्यातील कठीण प्रसंगात हसायला शिका… हास्य हे सगळ्या गोष्टींवरील उपाय आहे. रात्री चंद्राकडे पाहण्यासाठी मी जेव्हा आकाशात पाहतो तेव्हा तो चंद्र काळ्या ढगांनी झाकलेला असतो. त्या काळ्या ढगांना पाहून मी सहज हसतो आणि ढगांमधून माझ्या चेहऱ्यावर पावसाच्या थेंबांचा वर्षाव होतो. गडद अंधारात तुमच्या एका स्मितहास्यामुळे खूप फरक पडू शकतो’.
गश्मीरची ही पोस्ट अत्यंत दिलासा देणारी आहे. या पोस्टवरील कॅप्शनमधून तो स्वतःच स्वतःला आधार देतोय असे वाटत आहे. गश्मीरच्या चाहत्यांनी त्याच्या या पोस्टला पसंती दिली आहे. सोबतच या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. एका नेटकाऱ्याने लिहिले, ‘अखेर तू नव्या ताकदीने परत आलास..’. तर आणखी एकाने लिहिलंय, ‘तुझे स्वागत आहे.. झाले गेले विसरुन जावे पुढे पुढे चालावे..’. याशिवाय अन्य एकाने लिहिले आहे कि, ‘तुला हसताना पाहून आम्हाला खूप छान वाटले… तू कायम असाच हसत राहा’. याआधी गश्मीरने खूप ट्रोलिंगनंतर इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत प्रश्न- उत्तरांचे सेशन घेतले होते. यावेळी त्याने अनेकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली होती. यानंतर आता त्याने ही पहिलीच पोस्ट शेअर करत नवीन प्रवासाला सुरुवात केल्याचे दिसत आहे.