क्या से क्या हो गयाsss… MHJ परिवारात नवख्याची एंट्री; समीर चौघुलेंनी शेअर केला ‘त्याचा’ फोटो


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अनेक कलाकार मंडळी प्रकाशझोतात आली. हे विनोदवीर आपल्या विनोद शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवतात. शोची संपूर्ण टीम कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. आता या विनोदवीरांच्या जत्रेत एका नवख्याची एंट्री झाली आहे. अभिनेते समीर चौघुले यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपल्या हास्यजत्रेत नव्या कलाकाराचे पदार्पण झाल्याची माहिती दिली आहे. चला तर जाणून घेऊया कोण आहे हा नवा कलाकार…?

अभिनेते समीर चौघुले यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘आमच्या हास्यजत्रेत नवीन अभिनेत्याचे पदार्पण..’. हा फोटो नीट पाहिला तर आपल्या लक्षात येईल हा कुणी नवखा अभिनेता नाहीये. तर हा प्रेक्षकांचा लाडका गौऱ्या म्हणजेच फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे आहे. समीर चौघुलेंनी शेअर केलेल्या या फोटो दिसणारा कलाकार गौरव मोरे आहे आणि त्याचा बदललेला लूक अगदी थक्क करणारा आहे. गौरव मोरेने चक्क त्याचे केस कापले आहेत. शिवाय त्याच्या कानात बाली दिसतेय. गौऱ्याचा हा बदललेला लूक खरंच आश्चर्यकारक आहे.

लांब झुपकेदार केसाचा गौऱ्या आता वेगळाच दिसू लागलाय. पण हा लूकसुद्धा त्याच्या चाहत्यांना आवडतोय. तर काहींनी गौऱ्याने केस कापायला नको होते.. असेही म्हटले आहे. इतकेच काय तर काहींनी गौऱ्याचा हा लूक नव्या सिनेमासाठी असेल असेही म्हटले आहे. दरम्यान हास्यजत्रेतील लोकप्रिय अभिनेत्री नम्रता संभेराव गौऱ्याचा हा नवीन लूक पाहताच कमेंट केली आहे. ज्यात तिने लिहिलंय, ‘समीर चौघुलेंनी दिली आनंदाची बातमी त्यांच्याकडे झाले नव्या पाहुण्याचे आगमन मुखडा पाहून व्हाल थक्क’.