हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अनेक कलाकार मंडळी प्रकाशझोतात आली. ज्यामध्ये गौरव मोरेचा समावेश आहे. त्याच विनोदाचं कमाल टायमिंग आणि त्याची हेअरस्टाईल प्रेक्षकांना प्रचंड आवडते. ‘आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा… टॅनना.. टॅनना..’ असं म्हणत जेव्हा अभिनेता एंट्री घेतो तेव्हा टाळ्यांचा कडकडाट होतोच. त्याची हेअरस्टाईल आणि हटके अंदाज त्याला इतरांपेक्षा वेगळं सिद्ध करतो. असं असताना अलीकडेच गौऱ्याने केस कापून नवा लूक केल्याचे समोर आले. त्याचा नवा लूक चाहत्यांना अजिबात आवडलेला नाही असे दिसत आहे.
जेव्हा गौऱ्याचा बदललेला लूक समोर आला तेव्हा अनेक नेटकरी कमेंट्समध्ये आपली नाराजी दाखवताना दिसले. गौऱ्याची केस उडवण्याची स्टाईल अत्यंत लक्षवेधी होती. त्यामुळे गौऱ्याची एंट्री नेहमीच कातिल असायची. असे असताना त्याने हेअर स्टाईल का बदलली..? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. दरम्यान गौरवने आपले मोठे केस का कापले याचे कारण दिले आहे. एका माध्यमाला मुलाखत देताना गौरव मोरेने केस का कापले..? त्यामागील नेमके कारण काय..? हे सांगितले आहे.
या प्रश्नाचे उत्तर देताना गौरव मोरे म्हणाला कि, ‘माझ्या अगामी चित्रपटासाठी मी केस कापले आहेत. पण फक्त दोन महिने.. मी पुन्हा माझ्या जुन्या रुपात प्रेक्षकांना दिसेन. जेव्हा मी केस कापले तेव्हा प्रेक्षकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. अनेकांनी मी केस कापायला नको होते अशी प्रतिक्रिया दिली. मात्र, कामासाठी मला केस कापायला लागले’. असे सांगत गौरवने चाहत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. गौरवच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं तर, तो लवकरच ‘अंकुश’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकाच्या भेटीला येणार आहे.