‘… ह्यापेक्षा मोठा आशीर्वाद नाही’; भरत जाधवांसाठी फिल्टरपाड्याच्या बच्चनची खास पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कला सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते भरत जाधव यांनी नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून कायम प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. आपल्या जबरदस्त कॉमिक अंदाजात त्यांनी दमदार अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात स्वतःचे भक्कम स्थान निर्माण केले आहे. १२ डिसेंबर रोजी भरत जाधव यांचा वाढदिवस झाला आणि यानिमित्त सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांनी विविध पोस्टच्या माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेनेदेखील एका पोस्टच्या माध्यमातून भरत जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रकाशझोतात आलेला फिल्टरपाड्याचा बच्चन अशी ओळख असणारा अभिनेता गौरव मोरे सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. विविध पोस्ट शेअर करत गौरव नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेत असतो. नुकतीच भरत जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त त्याने एक खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने भरत जाधव यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्यासोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘तुमचा हात पाठीवर असण ह्यापेक्षा मोठा आशीर्वाद नाही…. सर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!’ माहितीनुसार, गौरव मोरे हा भरत जाधव यांच्यासोबत ‘लंडन मिसळ’ या चित्रपटात झळकतो आहे.

‘सही रे सही’, ‘श्रीमंत दामोदर पंत’, ‘तू तू मी मी’, ‘मोरूची मावशी’ अशा नाटकांमधून तर ‘जत्रा’, ‘साडे माडे तीन’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘पछाडलेला’ अशा एका पेक्षा एक अव्वल कलाकृतींमध्ये भरत जाधव यांच्या भूमिकांची विशेष छाप आहे. त्यांच्या कलाकृती आणि त्यांच्या भूमिका या कायम प्रेक्षकांच्या स्मरणात राहिल्या आहेत. आजही ते सिनेसृष्टीत आणि रंगभूमीवर कार्यरत आहेत. सध्या त्यांचे ‘अस्तित्व’ हे नाटक सुरु आहे. ज्यामध्ये आपल्या अस्थित्वासाठी झगडणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे.