गौरव मोरेने घेतला हास्यजत्रेतून ब्रेक; कारण सांगत म्हणाला, ‘माझ्या सगळ्या स्किटमध्ये मारधाड..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ घराघरांत पाहिला जातो. या कार्यक्रमातून अनेक विनोदवीर प्रेक्षकांच्या भेटीला आले आणि त्यांच्या पसंतीस उतरले. यांपैकी एक म्हणजे अभिनेता गौरव मोरे. विनोदाचं परफेक्ट टायमिंग साधत गौऱ्याने कायम वेगवेगळ्या स्किट्समधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या कार्यक्रमामुळे गौरव मोरेला एक वेगळी ओळख मिळाली. गौरव मोरेला फिल्टरपाड्याचा बच्चन असे संबोधले जाते. गौऱ्याशिवाय हास्यजत्रेला मजा नाही हे प्रेक्षकांनी मान्य केले. असे असताना आता त्याने हास्यजत्रेतून ब्रेक घेतल्याचे समोर आले आहे.

अभिनेता गौरव मोरेने नुकतीच अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या गप्पामस्ती या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्यासह ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाबद्दल विविध खुलासे केले. केवळ हास्यजत्रा नव्हे तर वेगवेगळ्या चित्रपटांमध्येदेखील गौरव मोरे आपल्या अभिनयाची छाप पाडतोय. त्यामुळे प्रेक्षकांना त्याच्या आगामी प्रोजेक्ट्स आणि स्किट्सची फार उत्सुकता असते. अशातच MHJ सोडल्यानंतर अनेकांनी का..? हा प्रश्न विचारला. भार्गवीनेदेखील त्याला ‘तू महाराष्ट्राची हास्यजत्रा का सोडलीस..? असे विचारले असता गौऱ्याने अखेर या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

या प्रश्नाचे उत्तर देताना अभिनेता गौरव मोरे म्हणाला कि, ‘हा कार्यक्रम मी सोडलेला नाही. माझ्या खांद्याला दुखापत झाली असल्याने मी थोडे दिवस हास्यजत्रेतून ब्रेक घेतला आहे. सध्या या दुखापतीमुळे मी दोन ते तीन महिन्यांच्या ब्रेकवर आहे. कारण, एखादं स्किट सादर करताना ओढाताण होते. माझे स्किट पाहणाऱ्या प्रेक्षकांना आता माहितीच असेल की, माझ्या सगळ्या स्किटमध्ये मारधाड असते. सतत हालचाल केल्यामुळे खांदा अधिक दुखावू शकतो. हेच हास्यजत्रेतून ब्रेक घेण्याचं मूळ कारण आहे’.

‘याशिवाय या दरम्यान माझ्या एका सिनेमाचं शूटिंग सुद्धा होतं. त्याच्यासाठी मला ३० ते ३५ दिवसांचा वेळ काढावा लागणार आहे. दुखापत आणि सलग शूटिंग या दोन कारणांमुळे मी काही दिवस हास्यजत्रेतून ब्रेक घेतला आहे. तीन महिन्यांचा ब्रेक घेतो असं मी सरांना आधीच सांगून ठेवलंय. खांदा बरा होईपर्यंत आरामच करेन अन्यथा हे दुखणं असंच वाढत जाणार’. कारण समोर आल्यानंतर चाहत्यांनी गौऱ्याला ‘लवकर बरा हो’ म्हणत काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.