हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि अभिनेता स्वानंद तेंडुलकर आज एकमेकांसोबत लग्न बंधनात अडकले. पुण्यात कुटुंबीय, नातेवाईक आणि मोजक्या मित्र मंडळींच्या उपस्थितीत गौतमी- स्वानंद लग्नच्या बेडीत अडकले. सध्या सोशल मीडियावर गौतमी आणि स्वानंदच्या लग्नाचे बरेच फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत. दोघांनीही लग्नासाठी केलेले लूक प्रचंड लक्षवेधी ठरले असून त्यांच्या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
दोन दिवसांपूर्वी गौतमी आणि स्वानंदने आपल्या नात्याची जाहीर कबुली देत थेट लग्नाची बातमी जाहीर करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला. इतकंच नव्हे तर आज हे जोडपं लग्नबंधनात अडकलंसुद्धा. पारंपरिक पद्धतीने त्यांनी सप्तपदी घेतल्यानंतर त्यांच्या लग्नातील काही खास क्षण फोटोंच्या माध्यमातून व्हायरल झाले आहेत. लग्नासाठी दोघांनीही खास पीच थीममध्ये मॅचिंग कपडे परिधान केले होते. तर रिसेप्शनसाठी दोघांनीही साधा मात्र मराठमोळा लूक केला होता. त्यांच्या रिसेप्शनमधील एक फोटो अभिनेता अभिजित खांडकेकरने शेअर केला आहे.
अभिनेता अभिजीत खांडकेकरने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर स्वानंद- गौतमीच्या रिसेप्शन सोहळ्यातील एक फोटो शेअर केला आहे. अभिजीतने पत्नी सुखदा खांडकेकरसोबत गौतमी- स्वानंदच्या लग्नाला हजेरी लावली होती. यावेळी गौतमीने रिसेप्शनला मोरपिशी रंगाची पैठणी साडी नेसली होती. त्यावर भरजरी दागिने परिधान करत तिने लूक पूर्ण केला होता. तर, स्वानंदने मजंठा रंगाची शेरवानी परिधान केली होती. या फॅमिली फोटोत गौतमीचे आई- बाबादेखील दिसत आहेत.