गौतमी पाटीलचे वडील सापडले बेवारस अवस्थेत; नृत्यांगनेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्रभरात सबसे कातिल म्हणून ओळखली जाणारी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलची हवा दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. गौतमी दररोज नवनवीन कार्यक्रमांच्या सुपाऱ्या घेतेय आणि कार्यक्रम गाजवते आहे. असे असताना नुकतेच धुळे शहरात बेवारस आणि मरणासन्नावस्थेत गौतमीचे वडील आढळून आले. स्वराज्य फाउंडेशनचे प्रमुख दुर्गेश चव्हाण यांनी हिरे मेडिकल कॉलेजच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात त्यांना दाखल केले आहे. आधारकार्डद्वारे रुग्णाची ओळख पटल्यानंतर गौतमीपर्यंत ही बातमी पोहोचली.

एका नामवंत वाहिनीने दिलेल्या बातमीनंतर नृत्यांगना गौतमी पाटीलला आपल्या वडिलांची अवस्था समजली. आपल्या नृत्याच्या माध्यमातून राज्याला परिचित आणि तरुणाईमध्ये क्रेझ असलेल्या गौतमीला तिच्या वडिलांची अवस्था अशा पद्धतीने समजावी याहून अधिक दुर्दैव ते काय. दरम्यान अशी माहिती समोर आली आहे कि, वडिलांची अवस्था समजल्यानंतर गौतमीने त्यांना माणुसकीच्या नात्याने मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार गौतमीच्या वडिलांना उपचारासाठी पुण्यात हलवण्यात आले आहे.

दरम्यान गौतमीने एका व्हिडीओच्या माध्यमातून आपण वडिलांच्या उपचारासाठी शक्य तितके प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. गौतमीचे वडील रविंद्र बाबूराव नेरपगारे पाटील हे धुळ्यात बेवारस अवस्थेत आढळले होते. धुळ्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना हिरे शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या खिशात असलेल्या आधार कार्डवरुन ते गौतमीचे वडील असल्याचे समोर आले. गौतमीला हि माहिती मिळाल्यानंतर तिने धुळ्याच्या माजी महापौर जयश्री अहिरराव यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यास सांगितले होते. यांनतर आता गौतमी तिच्या वडिलांवरील उपचार स्वतःच्या देखरेखीत आणि स्वखर्चाने पुण्यात करत आहे.