‘प्रत्येक भागात ओव्हर अ‍ॅक्टिंग…’; बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची अंकिता लोखंडेवर टीका


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या ‘बिग बॉस हिंदी’चा १७ वा सीजन शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. दरम्यान या आठवड्याच्या नॉमिनेशन प्रक्रियेत स्पर्धकांच्या २ टीम केल्या गेल्या. यात मनारा, मुनव्वर, अभिषेक, अरुण यांची एक टीम आणि अंकिता लोखंडे, विकी जैन, इशा मालवीय आणि आएशा यांची दुसरी टीम होती.

स्वत:ला नॉमिनेशपासून वाचवण्यासाठी समोरच्या टीममधील स्पर्धकांना टॉर्चर करायचा हा टास्क होता. ज्यामध्ये स्पर्धकांच्या तोंडावर, डोळ्यात मसाले फेकण्यात आले. हा टॉर्चर टास्क खरोखरच टॉर्चर झाला. दरम्यान या टास्कमुळे मात्र अंकिता आणि तिची टीम प्रचंड ट्रोल झाली. यावर मराठी अभिनेत्री गायत्री दातारने देखील संतापतो व्यक्त केला आहे.

टॉर्चर टास्कमध्ये ‘बिग बॉस’ने ऐनवेळी बाजी पलटून अंकिता लोखंडेसह तिची संपूर्ण टीम नॉमिनेट केली आणि यामुळे अंकिता, इशा, आएशा आणि विकी जैन चौघेही नॉमिनेट झाले. यानंतर चौघंही घरातील इतर सदस्यांसोबत वाद घालू लागले. यावेळी अंकिता, इशा आणि आएशाने पातळी सोडून मनाराशी भांडण केलं. दरम्यान, मनारावर बरेच आरोप आणि टीका झाल्या. मात्र तिने सकारात्मकतेने गोष्टी सांभाळल्या असे गायत्रीचे म्हणणे आहे. दरम्यान गायत्रीने अंकितावर संताप व्यक्त करत म्हटले कि, ‘अंकिता खूप जास्त ओव्हर अ‍ॅक्टिंग करते असं माझं ठाम मत आहे. प्रत्येक भागात आपल्याला तिची ओव्हर अ‍ॅक्टिंग पाहायला मिळतेय’.

‘गेल्या काही भागांपासून घरात तिचा वावर दिसला तरीही त्रासदायक वाटतं. तिच्या मैत्रिणी इशा आणि आएशा या दोघींबद्दल तर मला काहीच बोलायचं नाही. या सगळ्यांनी मिळून मनाराच्या चारित्र्यावर बोट ठेवलं. तिच्यावर वाईट कमेंट्स केल्या… पण, त्या घरात मनारा एकटी सगळ्या गोष्टींना समोरी जात आहे. ”बिग बॉस मराठी”मध्ये मी स्वत: १२ आठवडे राहिली आहे. पण, कधीच एखाद्या स्त्रीच्या चारित्र्यावर कमेंट केली नाही. हे करणं अजिबात योग्य नाही. अंकिता आणि तिच्या दोन सेवक इशा – आएशाने या गोष्टी करणं ताबडतोब थांबवलं पाहिजे. आज नॅशनल टेलिव्हिजनवर या गोष्टी सुरू आहेत. एखाद्या महिलेला अशाप्रकारे अपमानित करणं अजिबातच योग्य नाही’. अशाप्रकारे पोस्ट शेअर करत गायत्रीने तिचा संताप व्यक्त केला आहे.