शिंदेशाहीचा एक सूर हरपला; प्रल्हाद शिंदेंच्या नातवाचे हार्ट अटॅकने निधन


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज सकाळी प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येचे वृत्त समोर आले. यानंतर संपूर्ण सिनेविश्वावर शोककळा पसरली. अशातच संगीत कला विश्वातूनही अत्यंत दुःखद वार्ता समजत आहे. शिंदेशाही घराण्यातील एक सूर हरपल्याचे हे वृत्त आहे. आनंद शिंदे यांचे बंधू दिनकर शिंदे यांचा मुलगा सार्थक शिंदे याचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. प्रल्हाद शिंदे यांचा नातू आणि आनंद शिंदे यांचा पुतण्या सार्थक शिंदे हा शिंदेशाहीचे भविष्य होता. आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे यांच्यासह सार्थक शिंदेदेखील शिंदे घराण्याचा संगीताचा वारसा चालवत होता. त्याच्या निधनाचा शिंदे कुटुंबियांना मोठा धक्का लागला आहे.

प्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांनी शिंदे घराण्याला संगीताचा वारसा दिला आणि हेच बाळकडू घेऊन पुढे आनंद शिंदे, मिलिंद शिंदे यांनी शिंदेशाहीचा आवाज जपला. यापुढील पिढीमध्ये मराठी तसेच बॉलिवूड संगीत विश्वात आदर्श शिंदे हे नाव तुफान गाजत आहे. तर उत्कर्ष शिंदे आणि मधुर शिंदेदेखील आपल्या कलागुणांनी संगीत विश्वात घट्ट पाय रोवत आहेत. असाच शिंदे घराण्याच्या संगीत वारसा वेगळ्या ढंगात पुढे नेणारा सार्थक या एक उत्तम तबला आणि ढोलवादक होता. मात्र तरुण वयातच सार्थकला देवाज्ञा झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, सार्थक दिनकर शिंदे यांचे निधन नांदेड येथे झाले. दिनांक ३१ जुलै २०२३ रोजी हृदय विकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. सार्थक हा एक उत्तम तबला आणि ढोलवादक म्हणून लोकप्रिय होता. विविध कार्यक्रमात तो आपल्या कलेचे प्रदर्शन करायचा. सार्थकच्या अचानक जाण्याने संपूर्ण शिंदे कुटुंब दुःखात आहे. तसेच सार्थकचे चाहते आणि त्याचा मित्र परिवार देखील शोकसागरात बुडाला आहे.