‘वेड’ चित्रपटाचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड; 1446 छत्र्यांचा वापर करून रचली कलाकृती


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सत्या आणि श्रावणी यांच्या प्रेमाचं ‘वेड’ बॉक्स ऑफिसवर तुफान गाजलं. प्रेक्षकांनीही हा चित्रपट डोक्यावर उचलून घेतला. अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शित अभिनित आणि जिनिलियाचं मराठी सिने विश्वातील पदार्पण प्रभावी कामगिरी करताना दिसले. या लोकप्रिय चित्रपटाचा येत्या २० ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ७ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर होणार आहे. यानिमित्त स्टार प्रवाह वाहिनीने एक अनोखा विक्रम रचला आहे. ज्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये करण्यात आली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीने आजवर अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी परंपरा मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपले आहे. अशातच आता अख्ख्या महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी त्यांनी कामगिरी करुन दाखवली आहे. वेड चित्रपटातून सत्या आणि श्रावणी यांच्या प्रेमाची गोष्ट आपण पाहिली. चित्रपटातील या दोन मुख्य पात्रांच्या आयुष्यात छत्रीचे एक वेगळे कनेक्शन दाखवले आहे. म्हणूनच स्टार प्रवाह वाहिनीने तब्बल १४४६ छत्र्यांचा वापर करून हृदयाच्या आकाराची भव्य कलाकृती तयार केली. २ दिवसांच्या परिश्रमानंतर हि कलाकृती पूर्ण करण्यात आली.

मराठी सिनेमा आणि मराठी वाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच असा आगळावेगळा प्रयोग करण्यात आला आहे. या प्रयोगाच्या माध्यमातून सत्या श्रावणीच्या प्रेमाशी खास नातं असणाऱ्या छत्रीचा वापर करून गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड केला गेला. यावेळी वेड चित्रपटातील सत्या म्हणजेच रितेश देशमुखने या कलाकृतीतील अखेरची छत्री स्वहस्ते ठवेळी आणि हा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड पूर्ण केला. स्टार प्रवाहने वेड सिनेमाच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर निमित्ताने रचलेला हा विक्रम कौतुकास्पद असून संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे. या मौल्यवान क्षणांबद्दल मी आणि जिनिलिया आभारी आहोत, अश्या शब्दात रितेशने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.