अंनिसच्या कार्यक्रमाला जत्रेकरांची हजेरी; हमीद दाभोळकर आभार मानत म्हणाले..


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम केवळ महाराष्ट्रात नव्हे तर परदेशातही मोठ्या संख्येने पाहिला जातो. या कार्यक्रमातून अनेक विनोदवीर आपल्या खास शैलीतून प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन करताना दिसतात. या कार्यक्रमात विविध स्किट, प्रहसन सादर करत हे कलाकार प्रेक्षकांना आनंद देतात आणि यासोबत सामाजिक भानदेखील जपतात. नुकतंच या कार्यक्रमातील कलाकारांनी डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या अंधश्रद्धा निर्मुलन समिती (अंनिस) साठी खास कार्यक्रम केला होता. यानिमित्त हमीद दाभोळकरांनी हास्यजत्रेतील कलाकारांचे आभार मानले आहेत.

हमीद दाभोळकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी लिहिले आहे कि, ‘सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि समीर चौघुले हे महाराष्ट्राचे आवडते लेखक दिग्दर्शक आणि कलाकार अनिस चा हास्य जागर या कार्यक्रमाला आले आणि त्यांच्या टीम सोबत दोन खळखळून हसवणारी तरीही विचार करायला भाग पाडणारी स्किट सादर केली … त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात ते मोठे आहेतच त्यांचे माणूस म्हणून मोठे पण या निमित्ताने अनुभवता आले..’

पुढे लिहिलंय, ‘अशी माणसं सामाजिक कामाच्या सोबत उभी राहतात तेव्हा अनिस सारख्या प्रवाहाच्या विरोधात पहाण्याचे काम करणाऱ्या चळवळींना ते खूप आधराचे असते. कार्यकर्त्यांचा काम करण्याचा उत्साह त्याने दुप्पटीने वाढतो… कृतज्ञता दोन्ही सचिन सर, समीर दादा आणि सगळी टीम…’. हमीद दाभोळकर यांनी हि पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. जी प्रचंड व्हायरल झाली आहे. या पोस्टवर कमेंट करत अनेक नेटकऱ्यांनी हास्यजत्रेच्या कलाकारांचे कौतुक केले आहे.