‘सुखी संसाराची वर्षपूर्ती..’; हार्दिक- अक्षयाने लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी शेअर केल्या एकमेकांसाठी खास पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांच्या लग्नाला आज १ वर्ष पूर्ण झालं आहे. झी मराठीच्या ‘तुझ्यात जीव रंगला’ या कार्यक्रमातून ऑनस्क्रीन या जोडीने प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवल्यानंतर खऱ्या आयुष्यात एकमेकांसोबत साताजन्माची गाठ बांधली. अक्षया आणि हार्दिक यांनी २ डिसेंबर २०२२ रोजी पुण्यात पारंपरिक पद्धतीने लग्न केले. ऑनक्रीन ते ऑफस्क्रीन लव्हस्टोरीला आज एक वर्ष पूर्ण झालं असून दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत.

प्रेक्षकांचा लाडका राणा दा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी याने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर लग्नातील काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘तू माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट आहेस. लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा..!!’ तर पाठक बाई म्हणजेच अक्षयानेसुद्धा हार्दिकसाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. यात तिने हार्दिकसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंसोबत अक्षयाने कॅप्शन देताना लिहिलंय कि, ‘एक वर्ष पूर्ण झाले, अजून खूप वर्ष बाकी आहेत. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा हार्दिक. माझा नवरा, माझा जोडीदार, माझा प्रियकर आणि माझा जिवलग मित्र झाल्याबद्दल धन्यवाद. मी तुझ्यावर खूप प्रेम करते’. या दोघांच्याही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून या पोस्टवर अनेक नेटकरी तसेच सिनेविश्वातील कलाकार मंडळी कमेंट्स करताना दिसत आहेत. या पोस्टवर कमेंट करताना प्रत्येक जण आपल्या लाडक्या जोडीला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.