हार्दिक जोशीच्या जवळच्या व्यक्तीचे निधन; भावुक होत म्हणाला, ‘तू आज आमच्यात नाहीयेस पण…’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता हार्दिक जोशी हा मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कलाकार आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत त्याने साकारलेला राणा दा त्याला प्रेक्षकांच्या जवळ घेऊन आला. सध्या हार्दिक त्याच्या आगामी कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. लवकरच झी मराठीवर ‘जाऊ बाई गावात’ हा नवीन कार्यक्रम सुरु होत आहे. ज्याचे सूत्रसंचालन हार्दिक जोशी करणार आहे. एकीकडे नव्या कार्यक्रमाचा आनंद आणि दुसरीकडे जोशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अभिनेता हार्दिक जोशीच्या कुटुंबातील अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. हार्दिकने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त केल आहे. हार्दिकने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या वहिनीचं निधन झालं आहे. या पोस्टमध्ये त्याने वहिनीसोबतच्या आठवणी शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘ज्योती वहिनी तू आज आमच्यात नाहीयेस पण तूझं अस्तित्व आमच्यात कायम राहील.. जाऊ बाई गावात हा जो नवीन शो मी करत आहे झी मराठीवर तो फक्त तुझ्यामुळे तो पुर्ण शो मी फक्त तुलाच डेडिकेट करतोय. कारण तू माझा हात हातात घेऊन प्रॉमिस घेतलं होतस की हार्दिक काही झालं तरी हा शो तू करणारच आहेस आणि योगायोग असा आहे की 4 डिसेंम्बर च्या दिवशी हा शो टीव्हीवर दिसायला सुरुवात होणार आहे आणि त्याच दिवशी तुझा वाढदिवस आहे’.

पुढे लिहिलंय, ‘मी नेहमी कामाला जाताना तुला नमस्कार करायचो तेव्हा कायम डोक्यावर हात फिरऊन तू मला आशीर्वाद द्यायची. तुझा आशीर्वाद असाच कायम माझ्या पाठीशी असुदे.. आज मी जे काही आहे त्यात तुझा खुप मोठा वाटा आहे. तु सदैव आई, बहिण, मैत्रीण म्हणुन माझ्या सोबत पाठीशी होतीस तशीच कायम रहा ही विनंती करतो. तुझी उणीव कायम भासत राहिल Miss you माझी लाडकी वहिनी मला कधी विसरु नको … Always love you always khup khup miss you’. या पोस्टवर, हार्दिकला ‘जाऊ बाई गावात’ हा कार्यक्रम स्वीकारण्यासाठी ज्या व्यक्तीने प्रोत्साहन दिलं त्या वहिनीच्या निधनामुळे अभिनेता शोकसागरात बुडाला आहे.