‘चंद्रयान- 3’च्या यशस्वी लँडिंगबद्दल अभिनेत्रीने व्यक्त केला अभिमान; म्हणाली, ‘कुणीच कल्पना केली नव्हती..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भारताची अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहीम ‘चंद्रयान ३’ यशस्वी झाल्याने सर्वत्र आनंदी आनंद झाला आहे. इस्रोने बुधवारी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘विक्रम’ लँडर आणि ‘प्रज्ञान’ रोव्हर सॉफ्ट लँडिंग केलं आणि इतिहास रचला. संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. यानंतर भारतीयांचा मोठा जल्लोष सुरु आहे. जगभरातून इस्रोच्या वैज्ञानिकांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येतं आहे. दरम्यान अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट शेअर करत इस्रोचे वैज्ञानिक आणि सर्व भारतीयांचे अभिनंदन करत आहेत. यामध्ये हेमांगी कवीचा देखील समावेश आहे.

अभिनेत्री हेमांगी कवीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले आहे कि, “काल जन्मवारीचा प्रयोग होता दु. ४.३० वा. चा आणि बरोबर ६ वा. नाटकाचा मध्यंतर झाला! आम्ही सगळ्यांनी आपआपले mobile काढले, ‘चांद्रयान’ live प्रेक्षपण लावलं. ४०-४१ दिवसांपासून ज्या क्षणाची आपण सर्वच वाट पाहत होतो तो क्षण असा असेल याची आम्ही कुणीच कल्पना केली नव्हती. जसं ते यान चंद्रावर व्यवस्थित land झालं तसं आमच्या तोंडून “भारत माता की जय” ची जोरदार घोषणा झाली. आहाहा काय तो क्षण!’

‘आपल्या ISRO ने संपूर्ण जगाला दिलेल्या या ऐतिहासिक क्षणाचा आनंद भारतीय म्हणून आम्ही नाट्यगृहाच्या green room मध्ये लुटला आणि त्याच जोशात नाटकाचा उत्तरार्ध सुरू केला! प्रयोग संपल्यावर नाटकातल्या एक दोन कलाकारांच्या वाढदिवसानिमित्त आणलेल्या cake सोबत ISRO चं, ‘चांद्रयान’ चं यश ही आम्ही साजरं केलं!’