‘माणूसपणाची सिसारी आली..’; रवींद्र महाजनींच्या निधनानंतर हेमांगी कवीची ‘ती’ पोस्ट चर्चेत


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वाचा विनोद खन्ना अशी ओळख असणारे ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीत शोकात बुडाली आहे. वयाच्या ७७ व्या वर्षी तळेगाव दाभाडे येथील आंबी गावातील फ्लॅटमध्ये रवींद्र मृतावस्थेत आढळले अन एकच खळबळ उडाली. त्यांचा मृत्यू नेमका केव्हा झाला हे काही समोर आले नाही. पण एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या मृत्यूची वार्ता अशाप्रकारे समोर यावी हे दुर्दैव! काल पुण्यात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील दिग्ग्गज मंडळींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. रवींद्र गेल्या काही महिन्यांपासून एकटे राहत होते हि माहिती समोर आल्यापासून सोशल मीडियावर त्यांच्या कुटुंबियांबाबत आणि मित्र मंडळींविषयी नकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. याविषयी बोलताना आता हेमांगी कवीने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने रवींद्र महाजनी यांचा मुलगा अभिनेता गश्मीर महाजनीचाही उल्लेख केला आहे.

हेमांगीनं लिहिलंय कि, ‘आपण कोण झालो आहोत..? काल जेष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी गेल्याचं कळलं. अर्थात आधी सोशल मिडिया वरून नंतर न्यूज चॅनलमधून. पण ते गेल्याची पेक्षा ते ‘कसे’ गेले याचीच ‘बातमी’ सर्वत्र जास्त पसरली! जाणाऱ्याला नीट जाऊ तरी द्या रे! नक्कीच बातमी देणाऱ्यांची आता ती style च झालीए बातम्या अशाप्रकारे लोकांपर्यंत पोचवण्याची! त्याशिवाय लोकं बातमीच बघत नाहीत असं त्यांना वाटतं. त्यांचा दोष नाही, शेवटी प्रत्येकाला पोट आहेच. पण त्या बातमीवर आलेल्या comments वाचून माणूसपणाची सिसारी आली. ते इतकं अंगावर आलं की श्रध्दांजली वाहणं नकोसं झालं! त्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही ही माहीत नसताना वाट्टेल ते बोलत सुटले लोक! त्यांच्या मुलाबद्दल, पत्नीबद्दल! असं मरण अनेक लोकांना येत असावं पण केवळ ते अभिनेते होते, प्रसिद्ध होते म्हणून वाट्टेल ते बोलण्याचा परवाना घेतला आपण!’

पुढे, ‘ज्या Heroला आपण लहानपणापासून पहात आलोय त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळणं खुप Surreal वाटतं मला! रंगीबेरंगी सिनेमात तुमच्या सोबत तुमच्या मुलीचं काम करण्याचं भाग्य मला लाभलं! रविंद्रजी जिथं कुठं आहात तिथं शांत असाल आणि आम्हांला माफ कराल अशी मी आशा करते!’ पुढे गश्मीरचा उल्लेख करत तिने लिहिले की, ‘गश्मीर महाजनी आधीच इतका struggle करून उभा आहेस, त्यात आता याची भर! Really very very sorry! And Strength to you, boy!’ सोबतच नेटकऱ्यांना सल्ला देत म्हणाली, ‘Yes, Social Media वर किंवा कुठेही व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांना आहे पण जरा तार्तम्य ठेवलं तर नाही का चालणार..? बातमी देणाऱ्यांना चेहरा नाही पण आपल्याला आहे! हे थोडं लक्षात ठेऊया! बास!’ हेमांगीची ही पोस्टदेखील सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.