हेमांगी कवी साकारतेय हिंदी मालिकेत मराठमोळी भूमिका; म्हणाली, ‘हे पात्र साकारताना..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमांगी कवी हि मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. हेमांगी केवळ तिच्या अभिनय शैलीमुळे नव्हे तर ती शेअर करत असलेल्या पोस्टमुळे देखील अनेकदा चर्चेत येताना दिसते. नाटक, मालिका, चित्रपट आणि वेबसीरिज अशा वेगवेगळ्या माध्यमातून हेमांगी आजवर प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. केवळ मराठी नव्हे तर हिंदी भाषिक प्रोजेक्ट्समध्ये देखील हेमांगी काम करते आणि अशाच एका आगामी प्रोजेक्टबाबत तिने पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री हेमांगी कवीने हि पोस्ट शेअर करताना लिहिलं, ‘आजपासून येतेय तुमच्या भेटीला! एक नवी भूमिका घेऊन! भवानी चिटणीस म्हणून! रोज रात्री १० वा; फक्त zeetv आणि zee5 वर. ‘कैसै मुझे तुम मिल गए’ मालिकेमध्ये! हिंदी मालिकेमध्ये मराठी पार्श्वभूमी असलेलं पात्र साकारताना अतिशय आनंद होत आहे. मालिकेच्या निर्मात्या मुक्ता धोंड मराठीच असल्यामुळे आपसुक एक आपलेपणा आणि तितकाच मोकळेपणा अनूभवायला मिळतोय! हाच आनंद तुमच्यापर्यंत पोचवण्याचं आणि तुमचं १००% मनोरंजन करता यावं हे बळ आम्हांला मिळो हीच ईच्छा! आतापर्यंत जसं प्रेम, आशीर्वाद देत आलात यापुढेही देत रहा ही विनंती!’.

माहितीनुसार, मराठी अभिनेत्री हेमांगी कवी ही झी टीव्हीवर आजपासून सुरु होणाऱ्या ‘कैसे मुझे तुम मिल गए’ या मालिकेत महत्वाची भूमिका साकारते आहे. या मालिकेत हेमांगी मुख्य नायिकेच्या आईची भूमिका साकारताना दिसणार आहे. तिच्या पात्राचे नाव भवानी चिटणीस आहे आणि या भूमिकेला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळेल याबाबत हेमांगी फारच उत्सुक आहे.

या मालिकेत हेमांगी कवीसोबत हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय चेहरा अभिनेत्री स्रिती झा आणि अभिनेता अरिजित तनेजा मुख्य भूमिकेत आहेत. याआधी देखील हेमांगीने हिंदी मालिकेत काम केले आहे. अलीकडेच तिने बॉलिवूड सिनेविश्वाची लाडकी अभिनेत्री सुश्मिता सेनसोबत श्री गौरी सावंत यांच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘ताली’ वेबसीरिजमध्येदेखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.