हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी ही सोशल मिडीयावर प्रचंड सक्रिय असते. उत्तम अभिनयासह परखड स्वभाव आणि थेट व्यक्त होण्यासाठी तिला जास्त ओळखले जाते. अनेकदा सोशल मीडियावर ती विविध पोस्ट शेअर करत अबोल विषयांना वाचा फोडताना दिसते. तर अनेकदा मनातील सल, दुःख, आठवणी शेअर करताना भावनिक होताना दिसते. अशीच एक बालपणीची आठवण नुकतीच तिने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या फॅमिलीचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे आणि सोबत कॅप्शनमध्ये व्यक्त झाली आहे. शिवाय नुकताच हेमांगी कवीची भूमिका असलेला ‘दो गुब्बारे’ हा सिनेमा जिओ सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. त्याचाही यात तिने उल्लेख केला आहे.
हेमांगीने लिहलंय, ‘हा आमचा Family photo! माझे आई, बाबा, भाऊ, बहीण आणि मी! पण तुम्हांला यात चारच माणसं दिसताएत ना! अंहं, मी धरून पाच आहेत! मी खरंच आहे या photoत. लहान असताना आपण सगळ्यांनीच आपल्या आई- बाबांच्या लग्नात आपण का नव्हतो किंवा मी कुठे होतो/होते photo काढताना असे लाज आणणारे प्रश्न चार चौघात विचारून आपल्या घरच्यांना हैराण केलेलं आहे. पुर्वी घरात आलेल्या पाहुण्यांना, नातेवाईकांना आपले photos/ album दाखवायची पद्धत बहुतांश घरात होती. आता हे ऐकताना odd वाटत असलं तरी ही पद्धत किंवा सवय म्हणूया Social Media वर आपण अबाधित ठेवलीए! तेव्हा त्या चार लोकांसमोर आपल्या पालकांची ‘‘आता हे कसं समजावयचं?’’ झालेली नाजूक परिस्थिती आपल्याला ‘कळायला’ लागल्यावर लक्षात येते आणि ते आठवून आताही हसायला येतं!आपल्या मोठ्या भावंडांनी आपण कसे रस्त्यावरच सापडलो आणि घरी घेऊन आलो किंवा बोहारणीकडून कसं एका साडीवर घेतलं असं सांगून त्रास दिलेला आहे! मी पण या सगळ्याला अपवाद नाही’.
हेमांगी पुढे लिहीते, मी या फोटोत नसण्याचं कारण विचारल्यावर माझ्या दादा- ताईने प्रथेप्रमाणे वरचीच टेप लावली! तेव्हा एवढं वाईट वाटलं होतं ना, माझी आई सांगते मी त्यादिवशी उपाशी राहीले होते! मग मी जेवावं म्हणून माझ्या आईने मला सांगितलं की मी तिच्या पोटात होते! हा फोटो काढत असताना ती चार महीन्याची गरोदर होती. आपण प्रत्यक्षपणे नसलो तरी वेगळ्या जगात अस्तिवात होतो! आयला म्हणजे आपण सुद्धा आहोत की या फोटोत! केवढा तो आनंद! आता हे खरं होतं की खोटं माहीत नाही. पण माझ्या बालबुद्धीला पटेल अशी story सांगून माझ्या आईने मी त्यांचीच मुलगी आहे याची खात्री दिली आणि तु पण होतीस या photo मध्ये सांगून आपलेपणाची मुळं कायमची घट्ट पेरली! आपल्याला कुणीतरी धरून आहे प्रत्यक्ष अप्रत्क्षपणे ही Feeling किती कमाल असते नाई? माझ्यासाठी हाच माझा Do Gubbare Moment आहे! तुमच्या आयुष्यात सुद्धा असे अनेक क्षण असतील ना? किंवा एखादा फोटो? नक्की शेअर करा’