हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे मंगळवारी मध्यरात्री निधन झाले. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही वर्षांपासून ते कॅन्सरसारख्या आजाराशी झुंज देत होते. काही महिन्यांपासून त्यांच्यावर टाटा रुग्णालयात उपचार सुरु होते. अगदी २ दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी आणले होते. मात्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टी हळहळली. दरम्यान अभिनेत्री हेमांगी कवीने रवींद्र बेर्डे यांच्या आठवणीत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
हेमांगीने ही भावनिक पोस्ट तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. यात तिने एका चित्रपटाच्या सीनचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना तिने लिहिले आहे कि, ‘रविंद्रदादा बेर्डे गेल्याची बातमी कळली आणि मी थेट कोल्हापुरात पोचले. २००८ साली ‘धुडगूस’ चित्रपटाचं चित्रीकरण कोल्हापुरात केलं होतं. त्यात मी रविंद्रदादांच्या मुलीचं काम केलं. तोपर्यंत मी त्यांना विनोदी भुमिकांमध्ये पाहीलं होतं. पण धुडगूस मधला त्यांनी साकारलेला बाप, निव्वळ कमाल. हा प्रसंग माझा सर्वात आवडता आहे.
‘यातली बापाची हतबलता, चुकीच्या घरात मुलीचं लग्न लावून दिल्याचा पश्चाताप, आता आपण मुलीसाठी काहीच करू शकत नसल्याच्या जाणिवेने कासावीस झालेला चेहरा हे सग्गळं काहीही न बोलता अगदी मोजक्या expressions मध्ये दाखवणं खुप कठीन असतं जे त्यांनी सहजगत्या केलं होतं. मला आठवतंय हे सगळं one take मध्ये झालं होतं. जो नट इतकी वर्ष हसवत आला त्याला असं रडताना पाहून काळीज पिळवटून निघतं! माझं तरी निघतं! ज्यांना लहानपणापासून पडद्यावर पाहत आलो त्यांच्याबरोबर screen share करायला मिळणं खुप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी!’